Belagavi

डीसी ऑफिससमोर फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण धोक्याबाहेर

Share

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

बेळगावात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, बेळगाव येथील डीसी ऑफिसमध्ये एका कुमार कोप्पद नावाच्या तरुणाने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गोकाक तालुक्यातील लगमेश्वर गावचा असून आमच्या कर्मचाऱ्यांनी याच्या घरच्यांशी संपर्क साधला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याचे मोठ्या भावाशी व गावात कोणाशी तरी भांडण झाले होते.

ग्रामस्थांनी त्याला पकडण्यासाठी ११२ क्रमांकाला पोलिसांना फोन केला होता. त्यानंतर गावातून पळून येऊन बेळगाव येथील एका नातेवाईकाच्या घरी तो राहिला. नातेवाईकांनी त्याला घरी जाण्यास सांगितले असता, वैफल्यग्रस्त होऊन त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विभाग तपास करत आहे. कुमार कोप्पद आता बरा झाला आहे. त्याच्या तब्येतीची कोणतीही समस्या नाही. डॉक्टरांची परवानगी घेऊन पोलीस त्या तरुणाची चौकशी करतील. त्याची मनस्थिती ठीक नसल्याची व तो एक वर्षापासून बीम्स रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags: