Belagavi

जुन्या पेन्शन योजनेसाठी बेळगावात रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्याग्रह

Share

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी रेल्वे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आज तिसऱ्या दिवशी बेळगाव रेल्वे स्थानकासमोर साखळी उपोषण सत्याग्रह केला.

1 जानेवारी 2004 रोजी व त्यानंतर रेल्वे खात्यात आणि केंद्र सरकारी नोकऱ्यांत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू केलेली नवीन पेन्शन योजना अन्यायकारी असल्याने ती रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी अशी रेल्वे कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी जॉईंट फेडरेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेन्शन स्कीम आणि ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशनने, झोनल अध्यक्ष अशोककुमार, सरचिटणीस डॉ. ए. एम. डिक्रूझ यांच्या आवाहनानुसार साऊथ वेस्टर्न रेल्वे मजदूर युनियनने तीन दिवसांपासून देशव्यापी साखळी धरणे सत्याग्रह सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव रेल्वे स्थानकासमोर रेल्वे कर्मचाऱ्यांनी धरणे सत्याग्रह केला. या सत्याग्रहात साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी इन न्यूजला माहिती देताना साऊथ वेस्टर्न रेल्वे मजदूर युनियनचे खजिनदार मुरलीधर कदम यांनी सांगितले की, 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर रेल्वेसेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने नवी पेन्शन योजना लागू केली आहे. ती निवृत्तीनंतरच्या गरज पूर्ण करण्यास असमर्थ आहे. त्याआधी भरती होऊन निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच त्यांच्या गरज भागविण्यासाठी जुनी पेन्शन योजनाच अपुरी पडत आहे. त्यामुळे 2004 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीनंतरचे जीवन जगणे कठीण होणार आहे. त्यामुळे नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना जारी करावी या मागणीसाठी आम्ही सत्याग्रह करत आहोत असे त्यांनी सांगितले.

आणखी एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, नवीन पेन्शन योजनेमुळे 2004 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. तो दूर करून जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आम्ही आंदोलन छेडले आहे. सरकारने आमच्या मागणीची दखल घेऊन ती पूर्ण करावी असा आमचा आग्रह असल्याचे सांगितले.

यावेळी आंदोलनकर्त्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. आंदोलनात साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: