Belagavi

बेळगावात नैतिक पोलीसगिरी :तरुण तरुणीवर जीवघेणा हल्ला

Share

समाजकंटकांच्या टोळक्याने एका तरुण तरुणीला लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण करून नैतिक पोलिसगिरी दाखवल्याची घटना शहरात घडली आहे. या संदर्भात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बेळगाव येथील किल्ला तलावाच्या काठावर बसलेल्या भाऊ बहिणीला , शेडमध्ये ओढून नेऊन ,मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. यमनापुर येथील रहिवासी असलेल्या भाऊ आणि बहिणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

राज्य सरकारच्या युवा निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दोघेही बेळगावात आले होते. सर्व्हरमध्ये अडचण असल्याने सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी तीन वाजता येण्याचे सांगितले. त्यामुळे किल्ला तलावाच्या किनाऱ्यावर थोडावेळ बसण्यासाठी दोघेही दुपारी एक वाजता आले.

मुलीसोबत का बसला आहेस? अशी विचारणा करीत काही हल्लेखोरांनी तरुणावर हल्ला केला. आम्ही प्रियकर प्रेयसी नाही, तर भाऊबहीण आहोत, हे त्यांना कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी ऐकले नाही. मात्र, 15 हून अधिक जणांच्या टोळक्याने दोघांना किल्ला तलावातील एका शेडमध्ये स्वतंत्रपणे नेऊन सुमारे तीन तास त्यांना अमानुष मारहाण केल्याचे पीडित तरुणाने सांगितले .

काही वेळाने तरुणाने पुन्हा काकांना फोन केला असता मोबाईल बंद होता. त्यांनी तात्काळ पालकांना फोन करून माहिती दिली. दुसरीकडे किल्ला तलावाच्या परिसरात त्यांच्या कुटुंबीयांनी येऊन आजूबाजूला शोध घेतला. त्यानंतर आरडाओरडा ऐकून त्यांनी शेडमध्ये जाऊन दोघांचीही सुटका करून जिल्हा रुग्णालयात नेले. सध्या दोघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून दोघेही अल्पवयीन आहेत. उर्वरित फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

Tags: