National

“लग्न होईपर्यंतच मुलगा मुलासारखा वागतो : न्या. बी. व्ही नागरत्ना यांचं परखड मत

Share

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी शुक्रवारी एक मत व्यक्त केलं आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की न्यायालयांनी कायमच लैंगिक समानतेच्या दृष्टीने आणि भेदाभेद संपवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलली आहेत. असं असूनही महिलांची नवी ओळख निर्माण झाली आहे असं वाटत नाही. असं नागरत्ना यांनी म्हटलं आहे.

महिलांना सशक्त करण्याच्या दृष्टीने, त्यांच्या सबलीकरण्याच्या दृष्टीने आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय घेतला आहेत. लैंगिक भेदभाव संपवण्यासाठी अनेक न्यायालयांनी आपल्या निर्णयांमधून पावलं उचलली आहेत. तरीही समाजात मुलगा-मुलगी यांच्यात भेद आजही केला जातो या आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. २८ व्या सुनंदा भंडारे स्मारक व्याख्यान सोहळ्यात त्यांनी या विषयावर भाष्य केलं.
काय म्हणाल्या आहेत नागारत्ना?
“भारतातल्या न्यायालयांनी, न्याय व्यवस्थेने कायमच स्त्री आणि तिच्या सबलीकरणावर भर दिला आहे. मात्र एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की मुलगा हा त्याचं लग्न होईपर्यंत आईचा मुलगा असतो. त्याचं लग्न झालं की त्याच्या प्राथमिकता बदलतात. मात्र एक मुलगी ही आयुष्यभर मुलगीच असते.” त्यांनी केलेलं हे विधान चांगलंच चर्चेत आहे.

अनेकदा महिलांना विविध अनुभव येतात
आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या, “महिलांना हे विचारलं जातं की त्यांना मासिक पाळी कधी आली होती? हा प्रश्न त्या गरोदर आहेत का? हे जाणून घेण्यासाठी विचारला जातो. खासगी क्षेत्रात महिला जेव्हा काम करत असतात तेव्हा मातृत्वाच्या रजेनंतर जेव्हा त्यांना कामावर रुजू व्हायचं असतं तेव्हा त्या जागी दुसऱ्या कुणाची तरी निवड झाल्याचं त्यांना समजतं. अनेक स्त्रियांची नोकरी त्यांना मूल झालं म्हणून जाते हे नाकारता येणार नाही.” असंही नागरत्ना म्हणाल्या.

विवाहसंस्था हा समाजाचा मुख्य आधार आहे
महिला असोत किंवा पुरुष या दोघांनीही लक्षात घेतलं पाहिजे की विवाहसंस्था हा समाजाचा मुख्य स्तंभ आहे. तसंच कुटुंबसंस्थेची समाजात एक महत्त्वाची भूमिका असते. कुटुंब म्हणून नवरा-बायको यांनी एकमेकांना समान वागणूक दिली पाहिजे. महिलांच्या आनंदाकडे प्रत्येकानेच लक्ष दिलं पाहिजे. तसंच एका यशस्वी पुरुषामागे त्याचं कुटुंब असलं पाहिजे. असंही मत नागरत्ना यांनी मांडलं आहे.

त्या आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाल्या, “आता ही वेळ आली आहे की पुरुषांना ही जाणीव व्हावी की, महिलांना आर्थिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाल्याने त्या सबळ झाल्या आहेत. हे मत जरी मांडत असले तरी आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र आहोत म्हणून महिलांनी पुरुषांवर अधिकार गाजवू नये. दोघांनीही एकमेकांना समान वागणूक दिली पाहिजे. नात्यात सन्मान असेल तर घरगुती हिंसाचारासारख्या घटना घडत नाहीत.” असंही मत न्या. नागरत्ना यांनी मांडलं आहे.

Tags: