Belagavi

बेळगावात 11 वी सतीश शुगर्स क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धा जल्लोषात

Share

बेळगावातील सीपीएड मैदानावर रोटरी अन्नोत्सवात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या उत्कंठावर्धक 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे अजिंक्यपद हरियाणाच्या नितीन चंडीला याने पटकावले. त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचे 3 लाख 55 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डचा एन सरबो सिंग पहिला उपविजेता व उत्कृष्ट पोजर ठरला तर कर्नाटकाचा धनराज दुसरा उपविजेता ठरला. २८० गुणांसह महाराष्ट्राच्या संघाने टीम चॅम्पियन्सचा किताब पटकावला.

होय तमाम शरीसौष्ठवपटूंचे लक्ष लागून राहिलेली 11 वी सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग चॅम्पिअनशिप बेळगावातील सीपीएड मैदानावर भरविण्यात आलेल्या रोटरी अन्नोत्सवादरम्यान शुक्रवारी सायंकाळी शानदार जल्लोषी वातावरणात पार पडली. आकर्षक विद्युत रोषणाई, फ्लड लाईट्सच्या झोतात देशभरातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पिळदार शरीरयष्टीचे शानदार प्रदर्शन करून शरीरसौष्ठवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वेगवेगळ्या पोझ सादर करून त्यांनी आपल्या भारदस्त शरीरसौष्ठवाचे उत्साहात प्रदर्शन केले. त्याला उपस्थित बेळगावकर आणि बेळगाव बाहेरूनही आलेल्या शरीरसौष्ठवप्रेमींनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात जल्लोष करत उत्स्फूर्त दाद दिली.

एकूण 10 वजनी गटात या बॉडीबिल्डिंग स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात देशभरातील 30 राज्यातून आलेल्या 250 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला. इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशन आणि कर्नाटक बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या मान्यतेने पार पडलेल्या 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत शरीरसौष्ठवपटुंवर बक्षिसांची अक्षरशः उधळण करण्यात आली. थोडीथोडकी नव्हे तर एकूण तब्बल 25 लाख रुपयांची खैरात यशस्वी शरीरसौष्ठवपटुंवर करण्यात आली.

यातील 23 लाख रुपयांची बक्षिसे सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी एकट्याने पुरस्कृत केली होती. अतिशय उत्कंठावर्धक वातावरणात झालेल्या 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे अजिंक्यपद हरियाणाच्या नितीन चंडीला याने पटकावले. त्याला मान्यवरांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा 3 लाख 55 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पहिला उपविजेता रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डचा एन सरबो सिंग याला 1.50 लाखाचा व उत्कृष्ट पोजर व दुसरा उपविजेता कर्नाटकाचा धनराज याला 1 लाखाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेविषयी ‘इन न्यूज’ला अधिक माहिती देताना इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशन आणि 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी अजित सिद्दण्णावर यांनी सांगितले की, बेळगावात होणाऱ्या सतीश शुगर्स राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेची देशभरातील शरीरसौष्ठवपटूंना प्रतीक्षा लागून राहिलेली असते. कोविडनंतर चार वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच बेळगावात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात देशभरातील 30 राज्यातील शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला.

स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या भरीव अर्थसाह्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली. त्यांनी एकूण 25 लाखांच्या बक्षिसांपैकी तब्बल 23 लाखांची बक्षिसे पुरस्कृत केली. त्यामुळे त्यांचे आम्ही सदा ऋणी आहोत. 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95 आणि 100 किलोवरील अशा एकूण 10 गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील 250 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला. स्पर्धेसाठी रोटरी अन्नोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे आभार व्यक्त करून अधिक माहिती दिली.

एकंदर, गेली 4 वर्षे कधी होणार याची प्रतीक्षा लागून राहिलेली 11 वी सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा बेळगावात दणक्यात पार पडली. या स्पर्धेमुळे बेळगावचे नाव देशभरात आणखी प्रसिद्ध होऊन बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला हे निश्चित.

Tags: