भारतीय भूदलातील सुभेदार विलास कृष्णा कळ्ळेकर 30 वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचे बेळगाव रेल्वे स्थानकावर तसेच मच्छे येथील स्वगृही जंगी स्वागत करण्यात आले.

मूळचे खानापूर तालुक्यातील जांबोटी गावचे सुपुत्र व सध्या बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील रहिवाशी विलास कृष्णा कळ्ळेकर 28 डिसेंबर 1993 रोजी भारतीय लष्करी सेवेत दाखल झाले होते. एकूण 30 वर्षे 3 दिवस सेवा पूर्ण करून ते नुकतेच 31 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते रेल्वेने बेळगावला परतले. त्यानिमित्त त्यांचे रेल्वे स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन, शाल व पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मच्छेपर्यंत भव्य मिरवणूक काढून स्वगृही देखील स्वागत करण्यात आले.
मच्छे येथे स्वगृही पोहोचल्यावर सुवासिनींनी सुभेदार विलास कृष्णा कळ्ळेकर यांचे औक्षण केले. जमलेल्या नागरिकांनी त्यांना पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी बोलताना कुशकुमार देसाई म्हणाले, सुभेदार विलास कृष्णा कळ्ळेकर यांनी भारतीय सैन्यात कर्तव्यदक्षतेने भारतमातेची सेवा बजावली आहे. बेंगळूर, आग्रा, पुलवामा, कुपवाडा, डेहराडून, जम्मू काश्मीर आदी आव्हानात्मक ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. कारगिल युद्धात त्यांना दृष्टी गमवावी लागली, तरीही त्यांनी एकूण 30 वर्षे 3 दिवस देशाची प्रामाणिक सेवा बजावून आज ते निवृत्त झाले आहे. इथून पुढील आयुष्यातही त्यांच्याकडून समाजाची व देशाची सेवा घडू दे, त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखा-समाधानाचे जाऊ दे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृष्णा कळ्ळेकर, रवींद्र कळ्ळेकर, भाऊ सावंत, सुरेश कळ्ळेकर, परशराम देसाई, लवकुमार देसाई, परशराम शिर्के, नामदेव देसाई, यल्लाप्पा मजूकर, नारायण नावगेकर, सुनील कळ्ळेकर, विनोद पाटील, युवराज बेळगावकर, अशोक सावंत, विशाल जाधव आदी उपस्थित होते.


Recent Comments