पौरकार्मिक शहराच्या स्वच्छतेचे चांगले काम करत आहेत. शहर सुशोभिकरण हे अत्यंत महत्वाचे आहे. पौरकार्मिक कमी पगारात जास्त काम करत आहेत. येत्या काळात कर्नाटक सरकार पौरकार्मिकांसाठी अधिक योजना राबवणार आहे, असे नगरप्रशासन व हज मंत्री रहीम खान यांनी सांगितले.
नगरविकास व नगर प्रशासन संचालनालय, बेंगळूर व बेळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव जिल्ह्यातील विविध नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त केलेल्या पौरकार्मिकांना थेट नियुक्तीपत्र वितरणाचा समारंभ आज बेळगावातील कुमार गंधर्व रंगमंदिरात पार पडला.
बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी, नगर प्रशासन व हज मंत्री रहीम खान, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, प्रकाश हुक्केरी, आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते पौरकार्मिकांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना महापालिका प्रशासन आणि हज मंत्री रहीम खान म्हणाले की, आज पौरकार्मिकांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पौरकार्मिक पहाटे 5 वाजल्यापासून शहर स्वच्छतेचे काम करतात. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शहरांमध्ये स्वच्छ, चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी काम करण्याचे निर्देश पौरकार्मिकांना दिले होते. आज आपले सरकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. पौरकार्मिकांना पुढेही अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सरकार सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, शहर स्वच्छ करण्यासाठी पौरकार्मिक गेल्या अनेक वर्षांपासून परिश्रम घेत आहेत. शहर स्वच्छतेसाठी ते चांगले काम करत आहेत. शहराचे सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. पौरकार्मिक कमी पगारात जास्त काम करतात, असे ते म्हणाले.
विधानपरिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी, पौरकार्मिकांना सेवेत कायम केल्याबद्दल सरकारचे आभार मानले, तसेच त्यांना दर महिन्याच्या 5 तारखेला नियमित पगार देण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, 5-6 महिन्यांपूर्वी आम्ही पौरकार्मिकांना वचन दिले होते आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू, तुम्ही आमचे शहर स्वच्छ करता त्यामुळे तुमची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमचे अधिकारी तुमच्या बाजूने विचार करत आहेत. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. ते म्हणाले की काही अडचण असल्यास आम्हाला सांगा आणि आमचे शहर स्वच्छ ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, एसपी भीमाशंकर गुळेद, मनपा सत्ताधारी गटनेते राजशेखर ढोणी, आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे, नगर नियोजन स्थायी समिती अध्यक्षा वाणी जोशी, अधिकारी, नगरसेवक, पौरकार्मिक उपस्थित होते.


Recent Comments