अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकींचे नाव देण्यात आल्याचा आनंद आहे, तसेच राम मंदिराजवळ वाल्मिकी मंदिरही असावे, अशी अपेक्षा मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
हावेरी येथे आज पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, देशात अनेक मंदिरे असून आता राम मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. या राम मंदिराजवळच महर्षी वाल्मिकी यांचे मंदिर बांधावे.
राममंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला राजकीय फायदा होतोय का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राजकारण कुठे होत नाही हे सांगा, कुठे फायदा आणि कुठे तोटा हे निवडणुकीनंतर कळेल.
राज्यात हिजाबचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून राज्य सरकारने हिजाबवरील बंदी हटवणार असल्याचे सांगितले आहे. याविषयी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, सरकारने असे म्हटले आहे, परंतु हिजाब घालणे किंवा सोडणे हा वैयक्तिक निर्णय आहे, असे आदेश दिलेले नाहीत, जसे चालत आले आहे तसे चालू द्या.


Recent Comments