Belagavi

वंटमुरी घटनेची पोलिसांना माहिती देणाऱ्यांचा सत्कार

Share

बेळगाव तालुक्‍यातील वंटमुरी गावात महिलेची विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेची माहिती सर्वप्रथम पोलिसांना देऊन हे हीन कृत्य रोखण्यास मदत करणाऱ्या तीन नागरिकांचा आज बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे सत्कार करण्यात आला.

बेळगाव तालुक्‍यातील वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या नागरिकांचा बेळगाव शहर पोलिसांनी सन्मान करून अभिनंदन केले. शहरातील पोलीस परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला.
यावेळी वंटमुरी गावचे रहिवासी जहांगीर तहसीलदार, वसीम मकानदार व ग्रामपंचायत अध्यक्ष सिद्धप्पा होळीकर यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी जहांगीर यांना न्यायालयाने दिलेले प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले. या तिघांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच काकती स्थानकाचे पीएसआय मंजुनाथ हुलकुंद यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत घटना थांबवली. त्याबद्दल त्यांचा व सहा पोलीस कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.  यावेळी बोलताना बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की, वंटमुरी गावात घडलेल्या घटनेला रोखणाऱ्यांचा आम्ही सन्मान केला आहे. वंटमुरी गावातील तीन जणांचा आम्ही सन्मान केला आहे. न्यायालयाने दिलेले प्रशंसापत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे. काकती स्टेशनचे पीएसआय व सहा पोलिसांचा गौरव केला. आम्ही पीएसआयला 5000 रोख आणि उर्वरित पाच कर्मचार्‍यांना 4000 बक्षीस दिले आहे. अशा घटनांची माहिती पोलिसांना देणार्‍या तीन जणांचे आम्ही संरक्षण करू. असे बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सांगितले.

अनुचित घटना घडल्यावर न घाबरता पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी त्यांचा सन्मान केला याचा मला आनंद आहे, असे सत्कार झालेल्या जहांगीर आणि वसीम मकानदार यांनी सांगितले.  या कार्यक्रमाला शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, डीसीपी स्नेहा, एसीपी सदाशिव कट्टीमणी, एसीपी गिरीश, सिद्धनगौडा पाटील आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Tags: