Belagavi

कंग्राळी बुद्रुक येथे श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस

Share

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस व वार्षिक यात्रा भक्तिभावाने, उत्साहात साजरी करण्यात आली.

बेळगावला लागूनच असलेल्या कंग्राळी बुद्रुक गावात श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस व ओटी भरण्याच्या कार्यक्रम आज शनिवारी उत्साहात पार पडला. आज सकाळपासून मंदिरामध्ये देवीची विशेष पूजा करण्यात आली. यात्रेनिमित्त मंदिरात लक्ष्मीदेवीची पुष्पहार व फुलांनी विशेष सजावट करण्यात आली होती. भंडारा उधळण करत गावामध्ये कलश मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना लक्ष्मीदेवी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदा, आज महालक्ष्मी देवीचा वाढदिवस अर्थात ओटी भरण्याचा कार्यक्रम देवसकी पंच, देवस्थान सेवा समितीच्या वतीने पार पडला. पारंपरिक पद्धतीने देवीची पूजाअर्चा करून ओटी भरण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ व भाविकांतर्फे ओटी भरण्यात आली.

त्यानंतर गावामध्ये उत्साहात यात्रेला प्रारंभ झाला. यासाठी देवसकी पंच, देवस्थान सेवा समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  दरम्यान, यात्रेनिमित्त महालक्ष्मी मंदिराची सुंदर सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात श्रीफळ, हार, कपूर, उदबत्ती आदी पूजा साहित्याची तसेच महिलांचे दागिने, खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती.

Tags: