Belagavi

‘ब्रँड बेळगाव’ विकसित करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करेन : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगाव शहराला ‘ब्रँड बेळगाव’ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मी यथाशक्ती प्रयत्न करेन, त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव तालुक्यातील बामणवाडी शांताई वृद्धाश्रम येथे आज, गुरुवारी जयभारत फौंडेशन आणि शांताई वृद्धाश्रम यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात महिला ‘बी’ विंगचे उद्घाटन मंत्री हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांचा मारिया मोरे आणि वृद्धाश्रमातील आजींच्या तसेच किणये ग्रापं सदस्यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले.

सत्काराला उत्तर देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठी सर्व उद्योगपतींनी बेळगावच्या विकासासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. शांताई वृद्धाश्रमात
वृद्धांचे जीवन सुसह्य होण्यासाठी विजय पाटील, विजय मोरे आणि त्यांचे कुटुंबीय करत असलेल्या प्रयत्नांचे तसेच आश्रम अतिशय स्वच्छतापूर्ण ठेवल्याबद्दल कौतुक केले. आपण
वृद्धाश्रमासाठी आवश्यक असलेले कोणतेही सहकार्य, सेवा शासन स्तरावरून देण्यासाठी व मदत करण्यास सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी पाहुण्यांसाठीच्या खोल्यांची पायाभरणी अशोक आयर्न वर्क्सचे एमडी जयंत हुंबरवाडी यांच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्षस्थानी शांताई वृद्धाश्रमाचे संस्थापक विजय पाटील होते.


कार्यक्रमाला माजी एपीएमसी व बुडा चेअरमन युवराज कदम, उद्योजक किथ मचाडो, दिलीप चिटणीस, सिद्धार्थ हुंदरे, आनंद देसाई, प्रवीण दोड्डण्णावर, विश्वनाथ सामंत, राजेंद्र हरकुणी, नीलेश कोचा, बसवनगौडा पाटील, बामनवाडी ग्रामपंचायत अध्यक्षा शकुंतला हणबर, उपाध्यक्षा प्रियांका पाटील, सदस्या वर्षा डुकरे, शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे, जय भारत फाउंडेशनचे संचालक समीर कणबर्गी उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री. ऍलन मोरे यांनी केले.

Tags: