Belagavi

करवे प्रवीण शेट्टी गटातर्फे पालिकेसमोर धरणे

Share

बेळगाव महापालिकेच्या काल, बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत प्रशासकीय भाषा कन्नडकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत कन्नड रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटातर्फे आज पालिकेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप, विरोधी काँग्रेस आणि अपक्ष सदस्य मिळून 58 जणांनी हजेरी लावली. मात्र, सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मराठी आणि हिंदी वगळता कन्नड भाषा बोलली नाही. राजभाषा असलेल्या कन्नडकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ही चर्चा संपूर्णपणे मराठी आणि हिंदी भाषेत झाली, या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा करवे कार्यकर्त्यांनी दिला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे प्रवीण शेट्टी गटाचे जिल्हाध्यक्ष अभिलाष यांनी सांगितले की, बेळगाव महानगरपालिकेमध्ये महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत कन्नडमध्ये बोलण्याऐवजी मराठी व हिंदीत कामकाज चालले. यापूर्वी पालिकेत कन्नड, हिंदी आणि मराठी भाषिक नगरसेवक होते. तरीही महापालिका सभेत सर्व नगरसेवक कन्नडमध्ये बोलत असत. मात्र महापालिकेत प्रथमच राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक लढवली आणि महापालिका प्रशासन आणि विरोधी पक्षांनी कन्नडचे हित पाहण्याऐवजी व्होट बँकेसाठी कन्नड भाषेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

महापालिका बैठकीत कन्नड भाषेकडे दुर्लक्ष करून मराठी आणि हिंदी बोलणाऱ्या सदस्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी आर. अभिलाष, प्रेम चौगुला, राजू कलपत्री, नागनगौडा पाटील आदी उपस्थित होते.

Tags: