धारवाड जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात बेकायदेशीर मद्यविक्री वाढली आहे. अलीकडच्या काळात गावागावात बेकायदेशीर दारू विक्री उघडपणे सुरू आहे. यावर आळा घालण्याच्या मागणीसाठी धारवाड जिल्ह्यामधील महिला सरकारी कार्यालयात अर्ज घेऊन चकरा मारत आहेत.
धारवाड जिल्ह्याचे पालक मंत्री संतोष लाड यांच्या कलघटगी मतदारसंघातील बम्मीगट्टी, नेल्ली हरवी व गरुड हिन्नळी गावातील महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीसह शासकीय कार्यालयात आवाहन केले आहे. अवैध दारू विक्रीशी आमचा काहीही संबंध नाही, असे सांगून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला रस्त्यावर आल्या आहेत. नुकतेच नवलगुंद तालुक्यातील हणसी गावात महिलांनीच अवैध दारू पकडून उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात दिली आहे.
शहरातील बारमधूनच गावोगावी अवैध दारूचा पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. रात्री उशिरा लोक बेकायदेशीरपणे खोके भरून दारू गावोगावी आणत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुले-युवकांना दारू पिण्याचे व्यसन जडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय अवैध दारूमुळे ग्रामीण जीवनाची शांतता भंग पावत असल्याची ओरड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला करत आहेत. त्यामुळे जिल्हा पालक मंत्री संतोष लाड यांनी या बेकायदेशीर दारू विक्रीला ब्रेक लावण्याची कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
अवैध दारू विक्रीमुळे गावागावातील लहान मुले, युवक दारूच्या व्यसनाला बळी पडत आहेत. जिल्हा पालक मंत्री या अवैध दारू विक्रीला आळा कधी घालणार..? असा संतप्त सवाल लोक करत आहेत.


Recent Comments