Dharwad

हणसी गावातील महिलांचे दारू विक्रीविरोधात धाडसी पाऊल

Share

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील हणसी गावात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाल्याने संतप्त महिलांनी स्वतः रस्त्यावर उतरून गावात पुरवठा होत असलेल्या अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याची घटना घडली आहे.

हणसी गावात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात चोरट्या दारूची विक्री सुरू असून, अनेकवेळा गावातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाला याला आळा घालण्याचे आवाहन केले आहे. तरीही काही उपयोग होत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळीसकाळीच महिलांनी एल्गार पुकारला.

धाडसी पाऊल उचलत गावच्या मुख्य बसस्थानकाजवळ दुचाकीवरून अवैध दारू पुरवण्यासाठी आलेल्यांना फैलावर घेत दारू ताब्यात घेतली. यावेळी सुमारे २५ हजार रुपयांची दारू सापडल्याचे सांगण्यात आले. नवलगुंद पोलिसांना घटनास्थळी पाचारण करणाऱ्या ग्रामस्थ व महिलांनी अवैध दारूचे बॉक्स व दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.

अवैध दारूमुळे गावात सगळ्याच कुटुंबातील शांतता भंग पावली आहे. गावातील कोवळी मुले बिअर पिऊन त्यांचे आरोग्य तर बिघडवत आहेतच, शिवाय घरातील मोठी पुरुष मंडळीही दारू पिऊन घरातील शांतता बिघडवत आहेत. ही बेकायदेशीर दारू विक्री बंद करण्याची विनंती त्यांनी अनेकवेळा संबंधितांना केली पण प्रतिसाद मिळाला नाही.

अधिकाऱ्यांचे हे वर्तन पाहिल्यास अधिकारी बेकायदेशीर दारू विक्रीला मदत करत असल्याचा संशय येतो. त्यामुळे आमच्या मुलांसाठी आणि कुटुंबाच्या फायद्यासाठी आम्हाला हे पकडावे लागेल अशा परिस्थितीत आम्ही आलो आहोत. सध्या आम्ही बेकायदा दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. किमान आता तरी पोलिसांनी बेकायदा दारू विकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असा आग्रह महिला व ग्रामस्थांनी केला आहे.

याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून अधिकारी आणि नवलगुंदचे आमदार एनएच कोनारेड्डी यांच्या विरोधात संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags: