Belagavi

केंद्र सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काँग्रेसची जोरदार निदर्शने

Share

संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन केल्याचा निषेध करत ग्रामीण काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेळगावात आज निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

संसदेच्या दोन्ही सभागृहातील १४२ खासदारांचे निलंबन, केंद्रातील भाजप सरकारच्या घटनाविरोधी व लोकशाहीविरोधी कृतीचा निषेध करत काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी बेळगावात आज चन्नम्मा सर्कल येथे जोरदार निदर्शने केली. काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी चन्नम्मा सर्कल ते काँग्रेस भवनापर्यंत मोर्चा काढून केंद्र सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी काळ्या रंगाचे फुगे हवेत उडवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.

निदर्शनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या सरकारकडून देशात लोकशाहीची दररोज हत्या केली जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी देशाच्या संसद भवनात भाजप समर्थित बदमाशांच्या प्रवेशाचा निषेध केला आणि त्यांना निलंबित करण्यात आले. केंद्र सरकार हुकूमशाही धोरण अवलंबत आहे. सुरक्षेतील अपयश लपविण्यासाठी निलंबनाचे नाटक केले जात आहे. यात सभापती भाजपच्या एजंटसारखे वागत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका केली. यापूर्वी राजीव गांधी पंतप्रधान असताना आताच्या भाजप सरकारपेक्षाही अधिक बहुमत असूनही विरोधी पक्षांवर असा अन्याय करण्यात आला नव्हता, याची आठवण करून दिली.

या निदर्शनात काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रदीप एमजे, राजा सलीम, अजीम पटवेगार, बसवराज शेगावी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, आयेशा सनदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केपीसीसी पदाधिकारी व सदस्य, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: