बेळगावातल्या वडगाव परिसरातील आनंदनगर, केशवनगर, साई कॉलनी आदी परिसरात चोरटयांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आनंदनगर रहिवाशांनी स्वतःच रात्रीची गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे.
होय, बेळगावचा एक शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव भागातील आनंदनगर, साई कॉलनी, केशवनगर आदी परिसरात चोरटयांनी घरफोड्या करून गेल्या 8-10 दिवसांपासून अक्षरशः उच्छाद मांडला आहे. एका तरुणाने चोरट्यावर तलवारीने वार करूनही त्याने तेथीलच एका घरात चोरी केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री आनंदनगर तिसरा क्रॉस येथे घडली. त्यापूर्वी 13 डिसेंबर रोजी आनंदनगर दुसरा व तिसरा क्रॉस, साई कॉलनी, येथील 4 घरे फोडून लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारला आहे.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 14 डिसेंबर रोजी केशवनगरातील दोन घरे फोडून किंमती ऐवज आणि रोकड लांबविण्यात आली. पुन्हा शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी साई कॉलनीला लागून असलेल्या अनगोळच्या कनकदास नगरातील तब्बल 5 घरे फोडून लाखोंचा ऐवज लांबवला आहे. त्यानंतर दोन दिवस गप्प राहून सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आनंदनगर तिसरा क्रॉस येथील प्रशांत भातकांडे यांचे बंद घर फोडून किंमती ऐवज लांबवला आहे. त्यामुळे पोलीस खाते नक्की काय करत आहे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
या पार्श्वभूमीवर आनंदनगर येथील युवक व रहिवाशांनी आता स्वतःच रात्रीची गस्त घालून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी हातात लाठ्या-काठ्या घेऊन युवक गस्त घालत आहेत. टॉर्च घेऊन काठ्या घेऊन फिरणारे युवक रात्रीच्या वेळी या परिसरात दिसत आहेत. किमान आता तरी पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवाशांतून होत आहे.


Recent Comments