बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हिंडलगा मराठी हायस्कूलच्या 1972-73 च्या सुवर्णमहोत्सवी तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
होय, सोनेरी तुऱ्यांचे गुलाबी फेटे व जॅकेट परिधान केलेले माजी विध्यार्थी, गुलाबी साड्या परिधान केलेल्या माजी विद्यार्थिनी जणू शाळेच्या वर्गातच वावरत असल्यासारखे दृश्य हिंडलगा मराठी हायस्कूलमध्ये पहायला मिळाले. निमित्त होते, हायस्कूलच्या 1972-73च्या सुवर्णमहोत्सवी तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे! आपल्याला आयुष्यात सन्मानाने जगण्याचे बळ देणारी शाळा, तेथील शिक्षक आणि वर्गमित्र, मैत्रिणींचा तब्बल 50 वर्षांनी लाभलेला सहवास यामुळे हे सर्व माजी विध्यार्थी भारावून गेले होते.
मुख्याध्यापक रवी तरळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहमेळाव्यात माजी विध्यार्थ्यानी एकमेकांची विचारपूस करून सुखदुःखे वाटून घेतली. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत त्यात ते रममाण झाले. यावेळी उपस्थित गुरुजनांचा माजी विध्यार्थ्यानी हृद्य सत्कार करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली, तर शिक्षकांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या माजी विध्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. माजी विध्यार्थ्यांतर्फे अंजना अतिवाडकर व इरप्पा देवरमणी यांनी मनोगत व्यक्त केले.
विश्वास किल्लेकर यांनी प्रास्ताविक तर अशोक तरळे यांनी सूत्रसंचालन केले. फिलोमिना डिसोजा यांनी आभार मानले. कार्यक्रमात नाश्ता व जेवण प्रायोजित केल्याबद्दल युवराज पाटील, मेळाव्याचे संयोजन केल्याबद्दल विश्वनाथ किल्लेकर, बबन शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विध्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments