बेळगावात विशेषतः आनंदनगर वडगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून चोरटयांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काल, सोमवारी मध्यरात्रीही चोरटयांनी येथील तिसऱ्या क्रॉसवरील एका बंद घरात चोरी केली.
बेळगावात विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना, गेल्या आठवड्यापासून चोरटयांनी आनंदनगर वडगाव परिसराला लक्ष्य करून 5 ते 6 घरात चोऱ्या केल्या आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांत आणि जनतेतून ओरड झाल्यानंतर या परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात आली होती. मात्र त्यामुळे चोऱ्या होणार नाहीत ही अपेक्षा फोल ठरली आहे. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आनंदनगर तिसरा क्रॉस येथील प्रशांत भातकांडे यांचे बंद घर फोडून चोरटयांनी साहित्यावर डल्ला मारला. याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया अद्याप सुरु असल्याने नेमकं काय साहित्य चोरीला गेलं याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. एका घराच्या समोर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा एकटा फिरतानाचे दृश्य चित्रित झाले आहे.
विशेष म्हणजे काल रात्रीच्या घटनेत एकट्या चोरट्याने ही चोरी केली असावी असं स्थानिकांना वाटतं. आनंदनगर तिसरा क्रॉस येथील दत्त मंदिराजवळील प्रशांत भातकांडे यांच्या घरी चोरी करताना चोरटयांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावली होती. याबाबत येथील रहिवासी लता सुतार यांनी सांगितले की, मी मध्यरात्री लघुशंकेला उठले असता, बारीक सडपातळ शरीरयष्टीचा जॅकेट आणि टोपी घातलेल्या युवकाने माझ्या तोंडावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकून आवाज केल्यास गळा दाबेन अशी धमकी दिली. त्यामुळे मी आधी गप्प राहिले. नंतर आरडाओरडा केला. तो ऐकून आमच्या घरामागचे लोक जागे झाले. पण त्यांच्या घरांना बाहेरून कडी लावली होती. दरम्यान गस्तीवरील पोलीस धावत आले. तोवर चोरटा पळून गेला. अंधारामुळे त्याचा चेहरा नीट दिसू शकला नाही. समोरील घराचे गेट खुले असल्याने आम्ही पोलिसांना त्या घरात चोरी झाली असावी असे सांगितले. त्यानंतर पोलीस भातकांडे यांच्या घरी गेले. या घटनेने आम्हाला भीती वाटत असल्याचे लता सुतार यांनी सांगितले.
दरम्यान, अन्य एका महिलेने सांगितले की, मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान, कोणीतरी आमच्या घरात प्रवेश केला. बाहेरच्या खोलीत आमची मुलगी झोपली होती. ती घाबरून उठली नाही. पण आमच्या बेडवर ठेवलेले मोबाईल खिडकीत ठेवल्याचे नंतर दिसून आले. मात्र कोणतेही साहित्य लांबवलेले आढळून आले नाही. एकंदर, आनंदनगर वडगाव येथील बंद घरांना लक्ष्य करून ती फोडून चोऱ्या करण्याचे सत्र अज्ञात चोरटयांनी सुरु केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.


Recent Comments