Belagavi

जमीर यांच्या राजीनाम्यावरून विधानपरिषद तहकूब, विरोधकांचा सभात्याग

Share

सुवर्णसौधमध्ये सुरु अससेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत सकाळच्या सत्रात मंत्री जमीर अहमद खान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून झालेल्या गोंधळामुळे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यानंतर याच मुद्यावरून विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीवेळी जमीर अहमद खान यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. यावेळी सभागृहात मंत्री जमीर अहमद खान देखील उपस्थित होते. सभापती बसवराज होरट्टी यांनी कामकाजाला प्रारंभ झाल्याची घोषणा केल्यानंतर काही काळ कामकाज सुरळीत सुरु होते. नंतर काही वेळाने भाजप सदस्यांनी जमीर अहमद खान यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजीनामा देण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी यांनी, जमा अहमद खान यांनी असे वक्तव्य करून सभापतीसारख्या उच्च पदाचा अवमान केल्याने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यावरून गोंधळ माजला.

यावेळी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री जमीर अहमद खान म्हणाले की, तेलंगणा निवडणुकीवेळी बुद्धिवंतांच्या एका बैठकीत मी काँग्रेसला मते देण्याचे आवाहन केले. त्यावेळी तेथील लोकांनी आम्ही मते काँग्रेसलाच देतो, परंतु काँग्रेस महत्वाची पदे अल्पसंख्यांकांना देत नसल्याचे सांगितले. त्यावर मी कर्नाटकचे उदाहरण दिले. २०२३च्या निवडणुकीत काँग्रेसने १७ अल्पसंख्यांकांना उमेदवारी दिली. त्यापैकी ९ निवडून आले. त्यापैकी ५ जणांना काँग्रेसने मंत्री केले.

त्यात मला, सलीम अहमद यांना मंत्रिपद, रईमखान यांना मुख्य प्रतोद, नसीर अहमद यांना मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार आणि महत्वाचे म्हणजे यु. टी. खादर यांना विधानसभा अध्यक्ष केले आहे. कर्नाटकाच्या इतिहासात प्रथमच खादर यांच्या रूपाने एका अल्पसंख्यांकाला विधानसभा अध्यक्ष केले आहे. त्यांना माझ्यासह भाजपचेही सर्व आमदार नमस्कार करतात असे मी म्हटले. ‘सलाम वालेकुम’ म्हणतात असे म्हटले का?, असा सवाल करून, भाजप सदस्यांनी उगाचच चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करू नये असे त्यांनी सुनावले.

जमीर अहमद यांच्या विधानावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी पेपरमध्ये याबाबत बातम्या आल्या आहेत असे सांगताच सभापती होरट्टी यांनी पेपरवर विश्वास ठेवू नका असे सांगितले. यावर भाजप सदस्यांनी जमीर अहमद यांनी राजीनामा द्यावा किंवा सभागृहाची माफी मागावी असा घोषा लावल्याने काँग्रेस सदस्यांनीही त्याला विरोध केला. यावरून सभागृहात एकच गोंधळ माजला.  परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी, सभागृहात सभापती येताच सर्वजण उठून नमस्कार करतात, तो स्वीकारून सभापतीदेखील सर्वाना नमस्कार करतात. हा सभागृहातील लोकशाहीयुक्त शिष्टाचार आहे. तेच जमीर यांनी सांगितले. त्यात काय चूक? त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिले आहे. हा विषय येथेच थांबवावा अशी सूचना केली.

त्यानंतर बोलताना महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी, सभापती होरट्टी यांना उद्देशून तुम्ही प्रश्नोत्तराच्या तासात आऊट ऑफ वे जाऊन विरोधी पक्षाला चर्चेची संधी दिली. पण ते नाहक सभागृहाचा वेळ वाया घालवताहेत. अधिवेशन संपायला आता केवळ ३ दिवस उरले आहेत. अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घ्यायचे आहेत. अनेक विधेयके मांडायची आहेत. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास घेण्याची सूचना केली.
यावर सभापती होरट्टी यांनी, या विषयावर खूप चर्चा झाली आहे. मंत्र्यांनीही उत्तर दिले आहे.

त्यामुळे कामकाज सुरळीत सुरु करण्यास सहकार्य करा, असे विरोधी सदस्यांना सांगितले. मात्र भाजप सदस्य आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे घोषणा, आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले.  या दरम्यान, कामगार मंत्री संतोष लाड यांनी, १९४७मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक आहे असे म्हणणाऱ्या कंगना राणावतचा सिनेमा बघायला तुमचे युपीचे मुख्यमंत्री जातात, त्यावर काही बोला असे भाजप सदस्यांना डिवचले. त्यावर भाजप सदस्यांनी तारस्वरात घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पुन्हा गोंधळ माजला.

कोटा श्रीनिवास पुजारी, व्यंकटेश, जेडीएसचे सरवण आदींनी उभे रहात जमीर अहमद यांनी राजीनामा द्यावा किंवा माफी मागावी अशी मागणी पुन्हा लावून धरली. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सदस्यांत घोषणा-प्रतिघोषणा, आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. त्यामुळे सभापती होरट्टी चांगलेच संतापले. तुम्ही असाच गोंधळ घालणे सुरु ठेवले तर मी सभागृह बेमुदत काळासाठी तहकूब करेन असे सुनावले. तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने त्यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

दहा मिनिटानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर सभापती होरट्टी यांनी, सत्ताधारी व विरोधी सदस्यांना कामकाज सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. पण विरोधक आपल्या मागणीवर असून बसले. सभापतींनी भाजपच्या एन. रवीकुमार यांना बोलण्याची सूचना केली. रवीकुमार यांनी विरोधी पक्ष म्हणून मंत्री जमीर यांच्या वक्तव्यावर आमची भूमिका आम्ही मांडत आहोत, जमीर केवळ काँग्रेसचे किंवा अल्पसंख्यांकांचे मंत्री नाहीत तर संपूर्ण राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर अन्य विरोधी सदस्यांनी घोषणा देत त्यांना समर्थन दिले. त्यामुळे पून्हा गोंधळ माजला.

या दरम्यान सभापती होरट्टी यांनी शाळांची लहान मुले कामकाज पाहण्यास आली आहेत, त्यांना हा गोंद पाहून काय वाटेल याची तरी निदान जाण ठेवा, जबाबदारीने कामकाज पार पडू द्या असे सुनावले.  या दरम्यान, विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी यांनी आपली मागणी पूर्ण न झाल्याचा निषेध करत सभात्याग करत असल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ सरकार आणि मंत्री जमीर अहमद यांच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

Tags: