Belagavi

शालेय स्तरावरच मुलांना भविष्यात उपयोगी पडणारे शिक्षण द्यावे : अश्वत्थ नारायण

Share

शिक्षणातील असमानता दूर करून शालेय स्तरापासूनच विध्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडणारे तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण दिल्यास स्थानिक उद्योगांना कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होऊन उद्योग आणि पर्यायाने स्थानिक प्रदेशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण यांनी केले.

बेळगाव शहरासाठी व्यवसाय, शिक्षण आणि उद्योगासाठी उत्तम इकोसिस्टम कशी तयार करता येईल यावर चर्चा करण्यासाठी डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण यांच्याशी शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. फ्लो
अश्वत्थनारायण पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ९ वर्षांत शिक्षण, तंत्रज्ञान याला प्राधान्य देऊन डिजिटलायझेशनचे नवे पर्व सुरु केले.

जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेलाही जमले नाही असे डिजिटलायझेशन करून दाखवण्यात भारत आज यशस्वी झाला आहे. ५० कोटी जनतेला आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाती, डिजिटल पेमेंट, डिजिटल ट्रान्सफर द्वारे जोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत. भारताने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटलायझेशनमध्ये घेतलेली मोठी झेप आहे. शिक्षणातील असमानता दूर झाली पाहिजे. प्रत्येकाकडे बुद्धी असते, मुलांमधील शिक्षणाची आसक्ती वाढवली पाहिजे. विध्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच कोडिंगसारखे अभियांत्रिकी पातळीवरचे ज्ञान दिले पाहिजे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने आणलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनेक दूरगामी तरतुदी केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

विकासात हातभार लावण्यासाठी प्रत्येकाने आत्मसाक्षी होण्याची गरज आहे, असे सांगून अश्वत्थनारायण पुढे म्हणाले की, बदलांना आपण सामोरे गेले पाहिजे. वेळ खूप अमूल्य असतो. तो वाया घालवता कामा नये. आता नाही तर मग कधी? असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. माणूससुद्धा देवाने बनवलेले एक मशीन आहे, पण तिच्याशी छेडछाड केली जाऊ नये. योग्य शिक्षणाने सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व घडविणे शक्य आहे. त्यातून उध्योम व्यवसाय आणि शहराचा सर्वांगीण विकास घडवता येतो असे अश्वत्थनारायण यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीआयटीचे अध्यक्ष राज बेळगावकर यांनी केले. ब्रँड रागाचे सीईओ/संस्थापक शिव ममदापूर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उद्योगपती, शिक्षणतज्ञ आणि व्यवसाय मालकांनी अनेक समस्या आणि प्रशासनाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.

Tags: