Belagavi

कृत्रिम पाऊस पाडण्यावर विधानसभेत चर्चा

Share

अवर्षणामुळे राज्यात आवश्यक तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या विषयावर आज विधानसभेत चर्चा झाली.

शून्य प्रहरात राणेबेन्नूरचे आमदार प्रकाश कोळीवाड यांनी हा विषय उपस्थित करताना आपल्या मतदार संघात तसेच राज्याच्या अनेक भागात यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जनतेचे मोठे हाल होत असल्याकडे लक्ष वेधले. या समस्येवर काहीसा दिलासादायक तोडगा काढण्यासाठी क्लाउड सिडींगच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडता येईल असे त्यांनी सांगितले.

तसेच राणेबेन्नूर मतदार संघात कृत्रिम पाऊस पाडण्याची परवानगी द्यावी, यासाठी लागणारी आवश्यक रसायने व सामुग्री स्वखर्चाने देण्याची तयारी दर्शवली. सरकारने केवळ विमानाचा इंधन व पायलटचा खर्च सरकारने करावा अशी सूचना त्यांनी केली. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सध्या येणारे पाच दिवस उत्तम अनुकूल हवामान राहील असे भाकीत हवामान खात्याने व हवामान तज्ज्ञांनी केले आहे. हवेतर सरकारने त्यांना विचारून आजच तातडीने निर्णय द्यावा अशी मागणी आ. कोळीवाड यांनी केली.

यावर कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी आ. कोळीवाड यांची सूचना योग्य असल्याचे सांगून, हवामान खात्याच्या भाकितानुसार हवामान अनुकूल राहणार असल्याने हा प्रयोग यशस्वी होईल. याबाबत मी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, ते याबाबत सभागृहाला माहिती देतील असे सांगितले.

नवलगुंदचे आ. एन. एच. कोनरेड्डी यांनीही या विषयावर बोलताना,२०१३-१४ मध्ये एच. के. पाटील कृषी मंत्री असताना, प्रायोगिक तत्वावर कृत्रिम पाऊस पाडण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. हुबळी-धारवाडसह अनेक ठिकाणी सध्या दुष्काळ असल्याने पुन्हा एकदा हा प्रयोग सरकारने करून पहावा अशी सूचना त्यांनी केली.

सदस्यांची मते ऐकून घेतल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार म्हणाले की, कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यात पूर्वी करण्यात आला आहे. आजही देशातील अनेक राज्ये हा प्रयोग करत आहेत. पण राज्यात हा प्रयोग करण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. आमदारांनी आपल्या मतदारसंघात हा प्रयोग करण्याची मागणी केली असली तरी, अर्थ खात्याची परवानगी घेणे, विरोधी पक्ष आणि आमदारांशी चर्चा करून हा प्रयोग राबवला पाहिजे. ५० लाख, एक कोटी खर्च येणार असला तरी, अर्थ खात्याची परवानगी घ्यावीच लागेल. त्यामुळे अर्थ खात्याशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन डीकेशिनी दिले.

त्यावर आ. प्रकाश कोळीवाड यांनी, अर्थ खात्याने परवानगी दिली नाही तरी, किमान मुख्य सचिवांची परवानगी मिळवून द्या, प्रयोगाचा मोठा खर्च मी करेन असे सांगितले.

Tags: