कर्नाटक सरकारने उद्या, दिनांक 4.12.2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महामेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे बेळगावात महामेळावा घेण्याऐवजी उद्या सकाळी 11 वाजता शिनोळी येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्याची घोषणा केल्याने येनकेन प्रकारे महामेळावा होऊ न देण्याचा चंग कर्नाटकी सरकारने बांधला आहे. व्हॅक्सिन डेपोत महामेळाव्याच्या जागेची पाहणी करण्यास गेलेल्या समिती नेत्यांना आज पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावल्याची घटना घडली.
त्यानंतर समिती कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, आम्ही १९५६च्या भाषावार प्रांतरचनेत आमच्यावर अन्याय झाल्यापासून बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्र समाविष्ट करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने करत आहोत. कर्नाटकाच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठीच आम्ही महामेळावा आयोजित केला आहे. पण त्याला प्रशासन, पोलीस परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहेत. काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही प्रतीक्षा केली. त्यानंतर विचारणा केल्यावर परवानगी देणार नसल्याचे तोंडी सांगण्यात आले. पण आम्ही लेखी उत्तर देण्याची मागणी केली. तेंव्हा आज दुपारी एक वाजेपर्यंत उत्तर देऊ असे सांगण्यात आले. आज दुपारपर्यंत उत्तर अथवा परवानगी दिली नाही तरी आम्ही महामेळावा घेणारच. गेल्या वर्षीप्रमाणे कदाचित समितीच्या प्रमुख नेत्यांना महामेळाव्याधीच अटक करायचा प्रशासनाचा विचार असावा. तसे झाले तरी दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी अटकेची तमा न बाळगता उद्या महामेळावा घेऊन यशस्वी करावा आणि मराठी भाषिकांच्या तीव्र भावना दाखवून धाव्यात असे आवाहन त्यांनी केले
दरम्यान, महामेळावा घेण्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली ऍडव्होकेट राजाभाऊ पाटील, सरचिटणीस ऍडव्होकेट एमजी पाटील आदी नेत्यांचे पथक व्हॅक्सिन डेपोत गेले होते. त्यावेळी मार्केट उपविभागाचे एसीपी नारायण बरमणी यांनी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह व्हॅक्सिन डेपोला भेट देऊन त्यांना दरडावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी एसीपी बरमणी यांनी, जमावबंदी आदेश लागू केलेला असल्याने सगळ्यांना निघून जाण्यास फर्मावले. त्यावर माजी आमदार मनोहर किणेकर यांनी, जमावबंदी आदेश उद्या सकाळपासून लागू केलेला आहे, आम्ही आज जागेची पाहणी करत आहोत. महामेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज दिलेला आहे, अजून तुम्ही त्यावर कार्यवाही केलेली नाही. आज दुपारपर्यंत लेखी उत्तर द्या, मगच आम्ही येथून जाऊ असा पवित्र घेतला. त्यावर एसीपी बरमणी यांनी, एक नोव्हेंबर राज्योत्सव, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच बंद पाळणे, महामेळावा घेणे असे का करता असे विचारले. त्यावर, मनोहर किणेकर यांनी त्यांना चांगलेच खडसावले. १९५६ला भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठी लढत आहोत, २००४ला महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर कर्नाटकाने बेळगाववर आपला कब्जा सांगण्यासाठी २००६मध्ये सुवर्णसौध बांधली, तेथे अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला. बेळगाव तुमचेच होते तर १९५६ पासून तुम्ही हे सगळे का केले नाही? असा सवाल केला. त्यावर एसीपी बरमणी निरुत्तर झाले.
त्यानंतरही दुपारी एकनंतर येथून निघून जा, असे सांगत एसीपी बरमणी यांनी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे समिती कार्यकर्त्यांचे फोटो घेण्याची सूचना पोलिसांना केली. मात्र समिती कार्यकर्त्यांनी त्यालाही न बधता डेपोतच थांबून क्रिकेट मॅच पाहण्याचा आनंद लुटला. यावेळी व्हॅक्सिन डेपोला जणू पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने बेळगावात महामेळावा घेण्याऐवजी शिनोळी येथे रास्तारोको करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. म. ए. समितीच्या वतीने कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी बेळगावात उद्या महामेळावा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र महामेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून मेळाव्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. या संदर्भात एक पत्रही त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलेले आहे याची दखल घेऊन आज दिनांक 3 12-2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक होऊन या बैठकीमध्ये शिनोळी येथे रास्ता रोको कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी उद्या दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता बेळगाव, खानापूर, निपाणी व इतर भागातील कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ जमावे असे आवाहन समितीने केले आहे. हुतात्मा स्मारकाला वंदन करून सकाळी 11 वाजता रास्ता रोको कार्यक्रमाला शिनोळी येथे सुरुवात करावयाची आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे, अशी माहिती मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी इन न्यूजला दिली.
उद्या शिनोळी येथे होणाऱ्या धरणे व रास्ता रोको कार्यक्रमात कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार सीमा भागातील जनतेवर जो अन्याय करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचे या सीमा भागातील जनतेकडे आणि सीमाप्रश्न सोडवणुकीकडे होत असलेले दुर्लक्ष याचाही निषेध यावेळी करण्यात येणार आहे.


Recent Comments