राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना योग्य मोबदला, उसाला चांगला भाव, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी या मागण्यांसाठी येत्या 7 डिसेंबरला बेळगावात तीव्र आंदोलन करणार आहे, असे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चुन्नप्पा पुजेरी यांनी सांगितले.

चिक्कोडी शहरात आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना चुन्नप्पा पुजेरी म्हणाले की, 4 डिसेंबरपासून बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे सुरू होणारे हिवाळी अधिवेशन पाहता 7 डिसेंबर रोजी बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव शहरातील चेन्नम्मा सर्कल येथून दुपारी 12 वाजता भव्य पदयात्रेने जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांना एकरी 30 हजार रुपये भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे. साखर कारखानदारांकडून उसासाठी प्रतिटन 3500 रुपये आणि शासनाकडून 2 हजार मिळून 5500 रु. प्रतिटन दर द्यावा, जनावरांचा मृत्यू झाल्यास 50 हजार रुपये मदत द्यावी व कृषी विभागातील पाच हजार रिक्त पदे भरावीत, ग्रामसेवकांची भरती करावी, केंद्र व राज्य सरकारने कृषी कर्जाची संपूर्ण माफी करावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंदोलनात राज्यातील 31 जिल्हे आणि बेळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केले.
पत्रकार परिषदेला चिक्कोडी तालुकाध्यक्ष बसवराज पाश्चापुरे, राजेंद्र पाश्चापुरे, आनंद पाश्चापुरे, गजानन कोट्टेप्पगोळ, बसवन्नी डब्बा, मल्लाप्पा अंगडी, विवेकानंद घंटी आदी उपस्थित होते.


Recent Comments