Belagavi

बेळगावात रोटरीतर्फे येत्या रविवारी मोफत अवयवरोपण शिबीर

Share

रोटरी परिवार, बेळगावतर्फे येत्या रविवारी भरतेश शिक्षण संस्थेत मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन केले आहे.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत माहिती देताना रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांनी सांगितले की, रोटरी परिवारातर्फे बेळगावात येत्या रविवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत दिव्यांगांसाठी मोफत हात व पाय प्रत्यारोपण शिबीर आयोजित केले आहे. फोर्ट रोड येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या सभागृहात हे शिबीर होईल.

उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातील दिव्यांगांसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. सुमारे 400 दिव्यांग त्याचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. या शिबिरात पहिल्या टप्प्यात हात व पायांची मापे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर कृत्रिम हात व पाय बनविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिबीर घेऊन अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. त्याची तारीख व वेळ दिव्यांगांना व्हाट्सअप किंवा मोबाईलवर संपर्क साधून कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या शिबिराला सुमारे 20 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील मोठा वाटा पुणे येथील साधू वासवानी मिशनने उचलला आहे. त्याशिवाय भ्रतेश शिक्षण संस्थेनेही मोठी मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी, शहापूर, बेळगावातील मारवाडी युवा मंच, राजस्थानी युवक सेवा संघ आणि रेडक्रॉस अशा विविध स्वयंसेवी संस्थांनी शिबीर पुरस्कृत केले आहे. रोटरी परिवाराने यापूर्वी अशी 4 शिबिरे घेतली असून, हे पाचवे शिबीर आहे. उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातील दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जयदीप सिद्दण्णावर यांनी केले.

पत्रकार परिषदेला रोटरीचे पदाधिकारी राजेशकुमार तळेगाव, ज्योती मठद, उमेश गोराबाळ, चंद्रकांत राजमाने आदी उपस्थित होते.

Tags: