बेळगाव महापालिकेच्या आजच्या सभेत अपेक्षेप्रमाणे नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावरील हल्ल्याचा मुद्दा गाजला. प्रदीर्घ चर्चेनंतर हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांवर राज्यपाल, गृहमंत्री आणि मानवाधिकार आयोगाने कठोर कारवाई करावी अशा मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला.
बेळगाव पालिकेतील भाजप नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावरील हल्ल्याचा आणि नंतर त्यांच्या अटकेचा मुद्दा आजच्या पालिका सभेत अपेक्षेप्रमाणे चर्चेस आला आणि गाजलाही. सत्ताधारी भाजपने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने बैठकीत याविषयी काय निर्णय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. त्याची झलक बैठकीपुर्वीच पहायला मिळाली.
सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दंडाला काळ्या फिती बांधून हल्ल्याच्या निषेध केला. त्यानंतर बैठकीला सुरवात होताच सत्ताधारी गटाने हल्ल्याच्या निषेधाचा विषय चर्चेस घेण्याचा आग्रह महापौर शोभा सोमनाचे यांना केला. विरोधी गटाने विषयपत्रिकेवरील विषय चर्चेस घेण्याचा आग्रह केल्याने दोन्ही गटात काहीकाळ शाब्दिक युद्ध झाले. तीव्र उत्सुकता निर्माण करणारी महापालिकेची सभा म्हणजे काँग्रेस भाजपमधील आडमुठेपणाचा आखाडा होता.
बैठकीत आमदार अभय पाटील म्हणाले की, आज बेळगावात नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाला, उद्या जनतेवर हल्ला होईल. जवळकर यांना अटक झाली असली तरी पूर्ण चौकशी झालीच पाहिजे. पोलिस अधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे अटक केल्याने अन्य 57 नगरसेवकांमध्ये काम कसे करायचे याबाबत शंका उपस्थित केली आहे. भाग्यनगरमध्ये परवानगी न घेता बांधण्यात येत असलेल्या टॉवरबाबत माझ्याकडे स्थानिकांनी तक्रार केली .तसेच नगरसेवक अभिजित जवळकर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याची चौकशी करणाऱ्या जबाबदार नगरसेवकावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. ते रुग्णालयात असताना पोलिसांनी ते डिस्चार्ज झाल्याची प्रत तयार करून त्यांना अटक केली. हा काय प्रकार आहे? जवळकर यांना अटक करणाऱ्या सीपीआयला तत्काळ निलंबित करण्यात यावे, पोलीस एक चूक झाकून तीन चुका करत आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले की, नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो, अशाप्रकारे कोणालाही मारहाण होऊ नये. या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जमिनीवर बसून आंदोलन करावे लागल्याने शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचा अवमान झाला. हा संपूर्ण बेळगावच्या जनतेचा अवमान आहे. पोलिस आयुक्तांनी अशाप्रकारे वागणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. सीओडी आणि सीआयडीला तपासाचा अधिकार आहे. या प्रकरणात पोलिस आयुक्तांना बोलावण्याचा अधिकार महापौरांना आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना नगर रचना स्थायी समितीच्या अध्यक्षा वाणी जोशी म्हणाल्या की, नगरसेवकांवर हल्ला होणे ही निषेधार्ह घटना आहे. आम्ही नगरसेवक म्हणून जनतेच्या समस्या सोडवायच्या कशा? आमचे प्रभाग मोठे आहेत, उद्या अन्य कोणी आमच्यावर असा हल्ला केला तर कसे? त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
लेखा परिशोधन स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापूरे यांनी सांगितले की, आम्हाला प्रभागात रस्ते, गटारी, पथदीप अशा विविध कामांचा आढावा घेण्यासाठी प्रभागात फिरावे लागते. त्यामुळे अशावेळी कोणीही आमच्यावरही हला करण्यास धजावेल. त्याला प्रतिबंध करण्यासाठी जवळकर यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.
नगरसेविका सारिका पाटील व अन्य नगरसेवकांनीही या विषयावरील चर्चेत भाग घेतला. दरम्यान, नगरसेवक अभिजित जवळकर यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम सांगून जनतेच्या तक्रारीवरून चौकशी केल्याने आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले. टिळकवाडी पोलिसांवर संताप व्यक्त करून अशाप्रकारे धमक्या दिल्या तर आम्ही लोकांमध्ये जाऊन काम कसे करणार असा सवाल केला. सभेत उपमहापौर रेश्मा पाटील तसेच मनपा अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments