भाजपचे नगरसेवक अभिजित जवळकर यांना इस्पितळातून डिस्चार्ज मिळताच रातोरात झालेल्या अटकेचे बेळगावात आज तीव्र पडसाद उमटले. याचा निषेध करत भाजप नेते आणि नगरसेवकांनी शहर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, तर बेळगावचे बिहार करण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकार करत असल्याचा गंभीर आरोप दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला.
23 नोव्हेंबर रोजी भाग्यनगर येथे मोबाईल टॉवर उभारणीच्या परवानगीबाबत भाजपचे प्रभाग क्र. ४२चे नगरसेवक अभिजित जवळकर आणि स्थानिक रहिवासी रमेश पाटील यांच्यात बाचाबाची झाली होती. रमेश पाटील यांनी आपल्याला मारहाण करून लूटल्याची तक्रार देऊन नगरसेवक अभिजित जवळकर खासगी इस्पितळात दाखल झाले होते. त्यानंतर टिळकवाडी पोलिसांनी रमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. दरम्यान, काल रविवारी सायंकाळी नगरसेवक अभिजित जवळकर यांना अटक करण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.
त्यानंतर टिळकवाडी पोलिसांनी काल नगरसेवक अभिजित जवळकर यांना इस्पितळातून डिस्चार्ज मिळताच रात्री उशिरा इस्पितळात जाऊन अटक केली. जवळकर यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज सकाळी बेळगावात उमटले. महापौर शोभा सोमनाचे, भाजप राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके, सरचिटणीस मुरूगेंद्रगौडा पाटील, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह अनेक नेत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला. पोलीस आयुक्तांनी भेटीची वेळ देऊनही आपल्याला दारात अडवण्यात आले. बसण्यास सांगण्याचे सौजन्यही दाखवण्यात आले नाही, असा संताप भाजप नेत्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजप नेत्यांनी पोलिस आयुक्त सिद्रामप्पा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके यांनी,बेळगाव महापालिकेत सध्या भाजपची सत्ता असल्याने पोलीस खात्यावर दबाव टाकण्याचे काम काँग्रेस सरकारचे लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप केला.महापालिका बरखास्त करण्याचा काँग्रेसचा डाव फसला आहे. त्यामुळेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नगरसेवकाला अटक करण्यात आली. त्यांना रुग्णालयाचे बिलही भरू दिले नाही आणि त्यांना जबरदस्तीने अटक करण्यात आली. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. कोअर कमिटीशी चर्चा करून पुढील संघर्षाचा निर्णय हेण्यात येईल. काल आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी नगरसेवकांशी बोलून धीर दिला आहे. महापालिकेच्या राजकारणात स्वारस्य असलेले लोक पोलिसांवर दबाव आणत असून त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांचा हात आहे, असा आरोप बेनके यांनी केला.
यात काहीतरी काळेबेरे आहे, नगरसेवक जवळकर यांना तीन दिवसांनी का अटक करण्यात आली? केवळ एमईएसच नाही तर पाच-सहा संघटनांचा यात हात आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता संपविण्याचा त्यांचा डाव आहे. पण तो कोणत्याही कारणाने यशस्वी होणार नाही, असे बेनके म्हणाले.
भाजप राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली बोलतांना म्हणाले की, बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, धनंजय जाधव आदींसह आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन बेळगावातील घडामोडींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे की, बेळगाव शहरात काही संशयास्पद गोष्टी घडत आहेत आणि पोलिस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, एक व्हीडिओ निवेदन जारी करून आमदार अभय पाटील यांनी, काँग्रेस सरकार बेळगावात बिहारसारखी परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, नगरसेवकांना नोटीस न देता अटक करण्याचे काम टिळकवाडी सीपीआयनी केले आहे. डॉक्टरांवर दबाव आणून डिस्चार्ज द्यायला लावून नगरसेवकाना अटक करण्यात आली आहे. या घटनेने बेळगावात दहशत निर्माण झाली आहे. आम्ही या कृत्याचा निषेध करतो. गृहमंत्री जी. परमेश्वर सभ्य गृहस्थ आहेत. त्यांनी या प्रकरणी तातडीने टिळकवाडी सीपीआयना निलंबित करून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांनी सांगितले की, दि. 23 नोव्हेंबर रोजी भाग्यनगर येथील रहिवासी रमेश पाटील आणि नगरसेवक अभिजीत जवळकर यांच्यात मोबाईल टॉवर उभारणीवरून किरकोळ बाचाबाची झाली होती. प्राथमिक तपासानुसार रमेश पाटील आणि नगरसेवक जवळकर यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर जवळकर यांनी रमेश पाटील यांच्याविरोधात फिर्याद दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर रमेश पाटील यांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. रमेश पाटील यांच्या पत्नीने येऊन नगरसेवक अभिजीत जवळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जवळकर यांना अटक करण्यात आली आहे. यात कोणताही राजकीय दबाव नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
एकंदर, या प्रकरणामुळे बेळगावातील जनतेमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Recent Comments