Belagavi

गणवेशात ओली पार्टी करणे पोलिसांच्या आले अंगलट, दोघांचे निलंबन

Share

चिक्कोडी तालुक्यातील नागराळ येथे गणवेशात ओली पार्टी करणे दोन पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कंट्रोल रूम ‘112’च्या ड्युटीवर असताना दारू-मटणाची रंगीत ओली पार्टी करणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

चिक्कोडी तालुक्यातील नागराळ गावाच्या हद्दीत दोन कर्मचार्‍यांनी दारू-मटणाची रंगीत ओली पार्टी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पार्टी करणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित केले आहे.

याबाबत आज गुरुवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षात ‘112’ मध्ये ड्युटीवर असताना ओली पार्टी करणाऱ्या हवालदार कमते आणि शिपाई धुमाळ या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची चिकोडी डिवायएसपींकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल दोन पीएसआयना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

चिक्कोडी उपविभागाचे 112 क्रमांक नियंत्रण कक्षाचे दोन कर्मचारी ड्युटीच्या वेळेत सरकारी वाहनासोबत अल्कोहोल आणि मांसाहाराची पार्टी करत होते. त्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना हटकले असता एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, या कारवाईने बेळगाव जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.

Tags: