जिल्हा रूग्णालयात काही कर्मचारी गरीब रूग्णांकडून 5-5 हजार रुपये उकळत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना लुबाडण्याचा धंदा सुरू असल्याची तक्रार माजी नगरसेवकांनी बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्याकडे गुरुवारी केली.
बेळगावातील अनगोळ भागातील एका गरोदर महिलेला काल, बुधवारी प्रसूतीसाठी बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र एका कर्मचाऱ्याने तिच्या कुटुंबीयांकडे डॉक्टरांच्या नावाखाली 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी 5 हजार रुपये दिल्यावर तिला शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यापूर्वी आणखी 5 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. याबाबत महिलेच्या कुटुंबीयांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्याकडे तक्रार केली.
त्यांनी माजी महापौर विजय मोरे व इतर माजी नगरसेवकांशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, सुनील बाळेकुंद्री, माजी महापौर नागेश सातेरी, कन्नड कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आदींनी आज गुरुवारी सकाळी बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांची भेट घेऊन तक्रार केली. यावेळी संबंधित कर्मचारी आणि महिलेच्या कुटुंबियांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीपही ऐकविण्यात आली.
पैसे भरले तरच बेळगाव जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात रुग्णांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप आहे. येथील डॉक्टरांची वागणूकही योग्य नाही. विनाकारण पैशांसाठी ते रुग्णांच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याचा आरोप माजी महापौर विजय मोरे यांनी केला.
बेळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक दीपक जमखंडी म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात दर्जेदार उपचार करायचे असतील, तर येथील एजंटमार्फत आल्यास ते सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. ते थेट आले तर रुग्णाच्या कुटुंबीयांकडून पैसे गोळा करण्याचे काम करत आहेत. असे असेल तर जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालय यात फरक कुठे राहिला, असा संताप त्यांनी व्यक्त केला. फ्लो
तक्रारी ऐकून घेऊन बोलताना बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात दर्जेदार उपचार मोफत दिले जात आहेत. पैसे घेऊन उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, इन न्यूजशी बोलताना माजी नगरसेवक दीपक जमखंडी यांनी, पैसे मागण्याबाबतचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, बीम्स जिल्हा इस्पितळात डॉक्टरांच्या नावाखाली बाह्यकंत्राटी कर्मचारी रुग्णांच्या कुटुंबियांकडून पैसे उकळत आहेत. अनगोळमधील प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबियांकडून पैसे उकळल्याचा जो प्रकार घडला, तसाच प्रकार अन्य रुग्णांच्या बाबतीतही घडत आहे. त्यामुळे आज आम्ही माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी बीम्स संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याची कबुली दिली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन डॉ. शेट्टी यांनी दिले आहे.
माजी महापौर विजय मोरे म्हणाले की, बेळगाव शहरातील गोरगरीब, गरजू रुग्ण जिल्हा इस्पितळात उपचार वा तक्रारींबाबत आम्हाला संपर्क करतात. त्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य समजून त्यांच्या मदतीला धावतो. आजसुद्धा ही तक्रार आल्याने आम्ही बीम्स संचालक डॉ. शेट्टी यांना भेटून तक्रार केली आहे. येथील डॉक्टर चांगले काम करत आहेत. मात्र त्यांचे नाव सांगून काही कर्मचारी गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत आहेत. संबंधित कर्मचाऱ्याने ज्या डॉक्टरांचे नाव सांगून पैसे उकळले, त्यांनाही आम्ही भेटलो.
पण डॉक्टर दोषी वाटले नाहीत. डॉ. शेट्टी यांनी त्या बाह्य कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईकरण्याचे आश्वासन दिले असून, त्यांना संबंधित एजन्सीकडे सोवण्याचे ठरवले आहे. यापुढे जिल्हा इस्पितळात जर कोणीही रुग्ण वा त्यांच्या कुटुंबीयांकडे उपचार वा शस्त्रक्रियेसाठी पैसे मागितल्यास त्यांची गाठ आमच्याशी असेल असा इशारा देऊन कोणाकडेही पैसे मागितल्यास आपल्याशी संपर्क साधा असे आवाहन त्यांनी केले. माजी माजी नगरसेवक व विविध सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Recent Comments