Belagavi

बेळगावच्या विकासाला राज्य सरकारकडून ब्रेक : आ. अभय पाटील

Share

बेळगावसह संपूर्ण कर्नाटकाच्या विकासालाच राज्य सरकारकडून ब्रेक लावला जातोय, बेळगावातील नाला काँक्रिटीकरणाचे 100 कोटींचे काम सरकारने बंद पाडलेय असा आरोप बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केलाय.

बेळगावात आज, सोमवारी सकाळी आ. अभय पाटील यांनी प्रभाग क्र. 53 व 54 मध्ये सायकलवरून पाहणी दौरा करून समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर इन न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन 6 महिने झाले तरी, विकासासाठी एक नया पैसाही मंजूर केलेला नाही. याउलट भाजप जेंव्हा-जेंव्हा सत्तेत आला तेंव्हा-तेंव्हा राज्याच्या आणि बेळगाव शहराच्या विकासालाही भरपूर निधी मंजूर केला आहे.

बेळगाव महानगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व भागाच्या विकासासाठी 125 कोटी रुपये बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मंजूर केले होते. मात्र काँग्रेस सरकारने एक कोटी अनुदानही दिलेले नाही. सध्या बेळगावात जी विकासकामे सुरु आहेत, ती भाजप सरकारने मंजूर केलेल्या निधीतून सुरु आहेत. काँग्रेस सरकारने मात्र दिलेल्या वर्कऑर्डर रद्द करण्याचे काम केले आहे. बेळगावातील मुख्य नाल्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बोम्मई सरकारने 100 रुपये मंजूर केले होते. मात्र सध्याच्या सरकारने त्याची वर्क ऑर्डर रद्द केली आहे, हा काँग्रेस सरकारचा पराक्रम आहे. त्यामुळे बेळगावच्या विकासाला मारक ठरणार आहे असे त्यांनी सांगितले.

बी. वाय. विजयेंद्र यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना आ. अभय पाटील म्हणाले की, विजयेंद्र यांच्या नियुक्तीने राज्यातील युवकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात येत्या काळात भाजपचे संघटन अधिक मजबूत होणार आहे.

काँग्रेसच्या जनविरोधी सरकारला चोख उत्तर देण्यासाठी पक्ष कार्यकर्ते विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली लढतील. लवकरच विरोधी पक्षनेत्याचीही नियुक्ती होणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 28 जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, रमेश मैलगोळ, समाजसेवक सारंग राघोजीचे आदी उपस्थित होते.

Tags: