Belagavi

काय सांगताय? बेळगावात उसाबरी करण्यासाठी उसाबरी कट्ट्याचे उदघाटन?

Share

आधुनिक जीवनशैलीमुळे काँक्रीटच्या जंगलात शेजारी राहूनही एकमेकांचा परिचय नसणाऱ्या, एकलकोंडेपणाचा सामना कराव्या लागणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणून चर्चा करून विरंगुळ्याचे चार क्षण निवांतपणे घालविता यावेत ही आमदार अभय पाटील यांची “उसाबरी कट्टा” ही संकल्पना बेळगावात आज प्रत्यक्षात साकारली.

होय, टिळकवाडीतील नेहरू रोड कॉर्नरवर आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून ‘उसाबरी कट्ट्या’ची संकल्पना राबविण्यात आली आहे. या ठिकाणी रहिवाशांकडून कचरा टाकण्यात आल्याने ब्लॅकस्पॉट तयार झाला होता तो हटवून येथे एका सुंदर शेडसदृश्य कौलारू कट्टा उभारण्यात आला आहे. त्याचे उदघाटन आज दिवाळीनिमित्त करण्यात आले आहे. उसाबरी कट्ट्याचे उदघाटन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले की, पूर्वी या भागात अनेक लोक सायंकाळी किंवा मोकळ्या वेळी एकमेकांच्या घरांसमोर कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगवत. अशा चर्चेमुळे एकमेकांचे विचार समजून घेऊन संघटित राहता येते. मनातले विचार व्यक्त केल्याने मनाला समाधान मिळते आणि शांत झोपही लागते. पण आजकाल व्यस्त व आधुनिक जीवनशैलीमुळे, एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी राहुन देखील एकमेकांची ओळख नसते, संपर्क नसतो. त्यामुळे एकलकोंडेपणा येतो. त्यातून तणाव निर्माण होतो. त्यामुळे उसाबरी कट्ट्याची संकल्पना मतदारसंघातील प्रत्येक गार्डनमध्ये राबवली आहे. येथे येऊन सगळ्या रहिवाशांनी उसाबरी चर्चा करून निवांत क्षण अनुभवावेत हा यामागचा उद्देश आहे.

आ. अभय पाटील पुढे म्हणाले की, बेळगावातील सुशिक्षित युवक-युवती पुणे, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद सारख्या ठिकाणी आयटी इंडस्ट्रीत रोजगारासाठी जात आहेत. त्यांना बेळगावातच आयटी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मी भाजप सरकारच्या काळात मुरुगेश निर्वाणी उद्योगमंत्री असताना बेळगावात आयटी पार्कचा प्रस्ताव मांडला होता. रशियातील एक इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीदेखील बेळगावात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. आताचे काँग्रेस सरकार केवळ गॅरंटी देणारे अन अंमलबजावणी न करणारे सरकार आहे. या दोन प्रकल्पना ते कितपत गती देईल याबाबत शंकाच आहे. तरीही मी प्रयत्न व पाठपुरावा करून प्रलंबित योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही देऊन त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बाईट
नगरसेवक आनंद चव्हाण यांनी उसाबरी कट्टा निर्मितीमागची संकल्पना स्पष्ट करून, आ. अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ती संकल्पना प्रत्यक्षात आल्याने त्यांचे आभार मानले.

दोन स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, आ. अभय पाटील अनेक नवनवीन संकल्पना राबवून मतदारसंघाचा विकास करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा फायदा होत आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. बाईट+बाईट
यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, विनायक धारवाडकर, उमेश सरदेशपांडे, श्रीकांत परुळेकर,प्रकाश भट, विनोद धबाले यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

Tags: