देशभरात स्टार अभिनेत्री रश्मिका मंदन्ना हिच्या डीप फेक व्हिडिओने धुमाकूळ घातला असतानाच बेळगाव जिल्ह्यातही डीप फेक फोटो एडिटिंगचे असेच प्रकरण समोर आले आहे. प्रेमास नकार दिल्याने तरुणी आणि तिच्या दोन मैत्रिणींचे फोटो एडिट करून न्यूड स्वरूपात सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या नराधमाला खानापूर पोलिसांनी अटक केली आहे.
खानापूर येथील मंथन पाटील नावाच्या तरुणाचे एका तरुणीवर प्रेम होते. पण तरुणीने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने त्याने तिला तुझी आणि तुझ्या मैत्रिणींची बेअब्रू करू, अशी धमकी दिली होती. तरीही ती तरुणी न बधल्याने त्याने सोशल नेटवर्किंग साईटवर मुलीच्या नावाने बनावट खाते उघडून डीप फेक तंत्रज्ञानाने फोटो एडिट करून तो ज्या मुलीवर प्रेम करतो तिचा आणि तिच्या दोन मैत्रिणींच्या फोटोतील चेहरे न्यूड फोटोवर मॉर्फ करून ते अपलोड केले. या प्रकरणाने सुसंस्कृत समाजाला कलंक लागला आहे.
अशा प्रकारे सोशल नेटवर्कवर नग्न फोटो अपलोड करून कुप्रसिद्ध झालेला मंथन पाटील हा बंगळुरूमध्ये आयटी कर्मचारी आहे. पीडित तरुणीने धाडस करून पोलीस ठाण्यात येऊन आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार केली. खानापूर पोलिसांनी तत्काळ जागे होऊन गुन्हा दाखल करून आरोपी मंथनला अटक केली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, आरोपीने युवतीच्या खऱ्या नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो काढून डीपफेक फोटो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने एडिट केले आणि त्यानंतर युवतीचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडले आणि तिचे मॉर्फ केलेले नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. सुदैवाने तरुणीने पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार केली आणि आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. आता सायबर गुन्हे विभाग पुढील तपास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर करून अभिनेत्री रश्मिका मंदण्णाचा नग्न व्हिडिओ बनवणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करून तरुणींचे फोटो एडिट केले असावेत किंवा ते सामान्य तंत्रज्ञानानेही एडिट केले जाऊ शकते. त्यामुळे जर एखाद्यावर असा अन्याय झाला तर अजिबात संकोच करू नका आणि पोलिसांकडे तक्रार करा. आरोपींवर निश्चित कठोर कारवाई करू. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिले.
एसपींनी तरुणीच्या धाडसाचे केले कौतुक
सामान्यतः अशा घटना घडतात तेव्हा अनेक पीडित तरुणी आत्महत्या करतात किंवा त्याला बळी पडतात. मात्र या प्रकरणात पीडित तरुणीने धाडसाने पोलीस ठाण्यात येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली. एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक करून अन्य कोणावरही अन्याय होत असल्यास पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन केले.
एकूणच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सोशल नेटवर्कवर अशी प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींनी जागरूक राहायला हवे.


Recent Comments