Belagavi

‘हॉकी बेळगाव’तर्फे जिजामाता शाळेला हॉकी कीट प्रदान

Share

हॉकी बेळगाव संस्थेने आपल्या ‘हॉकी इन स्कूल’ उपक्रमांतर्गत बेळगावातील मराठा मंडळ संस्थेच्या जिजामाता कन्या शाळेला 14 हॉकी स्टीक्स, बॉल्स आणि कीट समारंभपूर्वक प्रदान केले.

हॉकी क्षेत्रात पूर्वीपासून बेळगावचा दबदबा राहिला आहे. बेळगाव शहराला हॉकीची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. बेळगावात हॉकीला गतवैभव मिळवून देण्यासाठी ‘हॉकी बेळगाव’ या संस्थेची अलीकडेच स्थापना करण्यात आली असून या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवून बेळगावकरात हॉकीची आवड निर्माण करण्यात येत आहे. त्यातूनच ‘हॉकी इन स्कूल’ हा उपक्रम संस्थेने राबवण्यास प्रारंभ केला आहे. बेळगावातील मराठा मंडळ संस्थेच्या चव्हाट गल्लीतील जिजामाता कन्या शाळेत आज हा उपक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत शाळेला 14 हॉकी स्टीक्स, बॉल्स आणि कीट देणगीदाखल देण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना हॉकी बेळगावचे सचिव सुधाकर चाळके यांनी शालेय जीवनात अभ्यासासोबतच हॉकीसारख्या खेळात भाग घेण्याचे आवाहन केले. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढतेच त्याशिवाय मानसिक तणाव दूर होण्यास मदत होऊन अभ्यासात एकाग्रता साधता येते. त्यामुळे रोज सकाळी व संध्याकाळी एक तास हॉकीचा सर्व करा, तणाव न घेता मनपूर्वक अभ्यास करा असा कानमंत्र त्यांनी दिला

जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील यांनी शाळेला हॉकी कीट दिल्याबद्दल हॉकी बेळगावचे आभार मानले. या साहित्याच्या मदतीने विद्यार्थिनींना उत्तम प्रशिक्षण देऊन किमान एकतरी उत्तम हॉकीपटू निर्माण करू अशी ग्वाही दिली. मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विद्यार्थिनींना सर्व खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. केवळ एक हॉकीची उणीव होती. तीसुद्धा तुमच्या मदतीमुळे पूर्ण झाले असे त्यांनी सांगितले.


यावेळी हॉकी बेळगावचे ज्येष्ठ सदस्य विकास कलघटगी, सदस्य उत्तम शिंदे, प्रकाश कालकुंद्रीकर, राजेंद्र पाटील, गणपत गावडे, संतोष दरेकर, शिवाजी जाधव, हॉकी कोच प्रफुल्ल काळोजी, फुटबॉल प्रशिक्षक जॉन डिसोझा तसेच जिजामाता हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: