बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पावसाने अचानक दमदार हजेरी लावून सर्वांनाच सुखद धक्का दिला.
बेळगाव शहरात व उपनगरी परिसरात बुधवारी पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विशेषतः सकाळी शाळेला जाणारे विध्यार्थी आणि चाकरमान्यांची पावसामुळे दाणादाण उडाली. रेनकोट, जॅकेट, छत्र्या अशा साधनांचा वापर करत पावसापासून बचाव करत ये-जा करताना दिसून आले.
सदाशिव नगर, नेहरू नगर, इंदिरा नगर, गांधी नगर, पाटील चाळ, खडेबाजार परिसर, वडगाव, टिळकवाडी, शहापूर, कॉलेज रोड, केएलई विद्यापीठाच्या आजूबाजूच्या परिसरात चांगला पाऊस झाला. या परिसरात शाळा-महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याने सकाळपासूनच विद्यार्थ्यांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागला.
बेळगाव शहरासह जिल्ह्यातील खानापूर, निप्पाणी, चिक्कोडी, कागवाड, बैलहोंगल, सौंदत्ती आदी तालुक्यातही या अवकाळी पावसाने हजेरी लावली. संपूर्ण जिल्ह्य़ात दाट ढगाळ वातावरण असून सकाळी ११ वाजेपर्यंत सूर्याची किरणे दिसली नाहीत.


Recent Comments