अचानक दिल्लीला रवाना होऊन राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या केपीसीसी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी राजधानी दिल्लीत बुधवारी नवा राजकीय बॉम्ब फोडला. दिवाळीनंतर जेडीएस-भाजपचे दिवाळे निघेल, 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे 15 आमदार काँग्रेस पक्षात सामील होतील असे सांगत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या डीके शिवकुमार यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होतील. अनेक भाजप आणि जेडीएस नेते आमच्या संपर्कात आहेत. 15 नोव्हेंबरला आमच्या पक्षात आणखी नेते सामील होतील, असे सांगून त्यांनी ‘ऑपरेशन हस्त’चे संकेत दिले.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीत भाजप आमच्या एका आमदारालाही फोन करू शकत नाही. भाजपमध्ये नेतृत्व निश्चित झालेले नाही. भाजप संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपलाच स्वतःच्या अनेक समस्या आहेत आणि त्यांनी आमच्या आमदारांना आकर्षित करणं दूरच आहे अशी खिल्ली डीके शिवकुमार यांनी उडवली.
भाजपला अस्तित्वहीन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सध्या ते बाजारात चलनात नसावेत. त्यासाठी भाजप नेते इथे तिथे जाऊन यांना-त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून बातम्यांचा विषय होत असावेत. नेत्यांनी काही कामाच्या मुद्द्यावर एकमेकांना भेटले तर बातमी होते, असे ते म्हणाले.


Recent Comments