चिक्कोडी परिसरात भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांना जनावरांना चारा पुरवता येत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. स्वतःच्या मुलांप्रमाणे पाळलेली गुरे नाईलाजाने गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत.


होय, यंदा ऐन हंगामात पावसाने ओढ दिल्याने राज्यात सर्वत्र भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील हातातोंडाला आलेली उभी पिके करपून गेली. तशातच अवर्षणामुळे चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पाळलेली गुरे जगवायची कशी यांची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे जनावरांचे आणखी हाल नको म्हणून नाईलाजाने शेतकरी जनावरे विक्रीला काढत आहेत. त्यांच्या या परिस्थितीचा दलाल, खरेदीदार गैरफायदा घेत आहेत. विशेष म्हणजे ज्या म्हशी 30 हजार ते 40 हजार रुपयांना विकायच्या होत्या, त्या म्हशी 15 ते 20 हजार रुपयांना मागितल्या जात आहेत. खरेदी करणाऱ्यांपेक्षा जनावरे विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने चारा बँक स्थापन करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
या भीषण दुष्काळाने जगाला अन्न देणारा बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. शेतात उगवलेले पीक पूर्णपणे सुकले असून, उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यांना दुग्धव्यवसायातून उदरनिर्वाह करावा लागतो, मात्र गुरांना चारा देणे त्यांना शक्य होत नाही. चाऱ्याशिवाय घरातील गुरांचे हाल बघवत नसल्याने त्यांनी गुरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. चिक्कोडी उपविभागातील विविध जनावरांच्या बाजारात शेतकरी विविध ठिकाणाहून शेकडो जनावरे विक्रीसाठी आणत आहेत. 30 ते 40 हजार रु. भाव येईल, अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना बाजारात आल्यावर मात्र धक्काच बसला. खरेदी करणाऱ्यांपेक्षा गुरे विकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लहान मुलांप्रमाणे पाळलेली गुरे विकण्याचे त्यांच्या जीवावर येत आहे. मात्र चाऱ्याअभावी त्यांचे दु:ख पाहवत ती विकल्याशिवाय दुसरा पर्यायही नाही अशी त्यांची व्यथा आहे.
सरकारने बेळगाव जिल्ह्यातील 14 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. विशेषत: चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चिक्कोडी, हुक्केरी, निप्पाणी, रायबाग, कागवाड, अथणी तालुक्यात यापूर्वी कधीही न अनुभवलेली दुष्काळी परिस्थिती असून शेतातील ऊस, मका, रताळी यासह सर्व पिके करपून गेली आहेत. पुरेशा पावसाअभावी सोयाबीनचे नुकसान झाले आहे. ज्या सरकारने दुष्काळी परिस्थितीत चारा बँका स्थापन करायला हव्या होत्या, त्या सरकारने डोळेझाक केली आहे. राज्य सरकारने दुष्काळ व्यवस्थापनासाठी सुमारे 22 कोटी 50 लाख रुपये निधी बेळगाव जिल्ह्याला जाहीर केल्याची माहिती आहे. मात्र आजतागायत दुष्काळ निवारणासाठी कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी व गुरांना पुरेसा चारा पुरवठा करण्यासाठी चारा बँक स्थापन करावी, अशी मागणी केली.
एकंदरीतच, भीषण दुष्काळामुळे शेतकरी दिवसेंदिवस नरकयातना भोगत असून शासनाने जागे होऊन अडचणीत सापडलेल्या अन्नदात्यांच्या मदतीला धावून जावे, अशी अन्नदात्यांकडून मागणी होत आहे.
डी. के. उप्पार, इन न्यूज, चिक्कोडी.


Recent Comments