बेळगाव येथील सांबरा विमानतळाच्या धावपट्टी आणि टर्मिनल विस्तारासाठी आवश्यक असलेली अंदाजे 57 एकर जमीन ताब्यात घेऊन ती विमानतळाला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती पावले उचलणार आहे असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या तरतूदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात बुधवारी (१८ नोव्हेंबर) आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
धावपट्टी आणि टर्मिनल जमिनीची आवश्यकता आणि त्याचा योग्य वापर यासंबंधीचा सर्वंकष अहवाल ब्ल्यू प्रिंटसह सादर करावा. त्याआधारे आवश्यकतेनुसार जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.
स्थानिकांना पर्यायी रस्ते आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विमानतळ संचालकांनी स्पष्ट व लेखी माहिती द्यावी, असे ते म्हणाले.
पुरेशी जमीन यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे धावपट्टी आणि टर्मिनलचे विस्तारीकरण, सिग्नल दिवे बसविण्यासाठी आवश्यक असलेली जमीनच दिली जाणार आहे. शक्य तेवढे आधीच दिलेल्या जमिनीवर कामे करावीत अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
या बैठकीत महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विजयकुमार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments