पावसाचा अभाव आणि वीज टंचाईमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना, राज्य सरकारने नवीन कृषी पंपसेट उभारणीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागेल असा आदेश काढून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. हा आदेश त्वरित मागे न घेतल्यास भाजप रयत मोर्चाच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राज्यसभा सदस्य व रयत मोर्चा राज्याध्यक्ष इरण्णा कडाडी यांनी दिला.
बेळगावात सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना रयत मोर्चा राज्याध्यक्ष खा. इरण्णा कडाडी यांनी राज्यातील काँग्रेस सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. विशेषतः शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यात सरकारला स्वारस्य नाही, मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांना आपली खुर्ची टिकेल की नाही याची चिंता सतावते आहे अशी टीका त्यांनी केली.
दुष्काळ, अनियमित लोडशेडिंग यामुळे आधीच होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने नुकताच एक आदेश बजावून पुन्हा संकटात लोटले आहे. कृषी पंपासाठी ट्रान्सफॉर्मर, पोल, वायर यासारख्या विजेशी संबंधित वस्तू स्वखर्चाने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या पंपसेटला वीज मिळावी, असे खासदार कडाडी यांनी सांगितले.
यापूर्वी प्रत्येक सिंचन पंपसेटसाठी केवळ २४ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते. मात्र शासनाच्या नव्या आदेशामुळे शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी किमान दीड ते दोन लाख रुपये मोजावे लागत आहेत. पावसाअभावी राज्यात मान्सूनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सध्या रब्बी हंगामामध्येही पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शासनाच्या अहवालानुसार राज्यातील 223 तालुके पूर्णपणे दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर 200 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र कुठल्याही मंत्री-आमदाराने त्यांच्या कुटुंबाची साधी भेटही घेतली नाही. आता अनियमित लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी सन्मान निधी, रयत विद्यानिधी, भू चेतना, भू सिरी, रयत शक्ती, क्षीर समृद्धी सहकारी बँक या पूर्वीच्या भाजप सरकारच्या शेतकरी हिताच्या अनेक योजना काँग्रेस सरकारने निधीच्या अभावाचे कारण देत बंद केल्या आहेत. हे शेतकरी विरोधी धोरण सरकारने सोडून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
सत्ताधारी काँग्रेस सरकारने जनतेच्या बाजूने राहून जनतेचे अश्रू पुसले पाहिजेत. राज्यात विरोधी पक्षाचा नेता नसला तरी आम्ही दुष्काळाचा अभ्यास करून शेतकऱ्यांचे सांत्वन केले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे नेते लढत आहेत. भाजप रयत मोर्चाचा राज्य अध्यक्ष म्हणून मी माझे काम करत आहे.केंद्रातून दुष्काळ अभ्यास पथक आले असून त्यांच्यासोबत आम्ही दुष्काळाचा अभ्यास दौरा केला आहे.
शेतकर्याचे जीवन अत्यंत असह्य आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपसंचांना स्वखर्चाने नवीन जोडणी घेण्याचा आदेश सरकार रद्द करून त्यांना पूर्वीप्रमाणेच वीज पुरवावी, असा आदेश काढण्याची मागणी कर्नाटक भाजप रयत मोर्चाची आहे. हा आदेश मागे न घेतल्यास शेतकऱ्यांचे नुकसान अपरिहार्य ठरेल. राज्यातील 35 लाख पंपसेट वापरकर्त्यांसोबत भाजपचा रयत मोर्चा रस्त्यावर उतरून लढणार आहे. राज्यभरात जिल्हा केंद्रांवर आम्ही आंदोलन करणार असून सरकारने नवा आदेश रद्द न केल्यास बेळगाव अधिवेशनात सुवर्णसौधवर धडक मोर्चा काढून घेराव घालण्यात येईल असा इशारा खासदार इरण्णा कडाडी यांनी दिला. बाईट
पत्रकार परिषदेला बेळगाव महानगर भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माध्यम समन्वयक शरद पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments