Belagavi

डिसेंबरमध्ये हॉटेल, लॉजचे खासगी बुकिंग नको : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

Share

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार असून, नेमकी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, अधिवेशन नीटपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी आयोजित अधिकारी व हॉटेल मालकांच्या पूर्वतयारीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
गतवेळप्रमाणे विविध समित्या स्थापन करण्यात येणार असून त्यात निवास समिती, भोजन समिती, साहित्य खरेदी व छपाई समिती, परिवहन व ऊर्जा समिती, आरोग्य समिती, पास वितरण समिती, तक्रार व्यवस्थापन समिती यांचा समावेश असून प्रत्येक समितीने प्राथमिक बैठक घेऊन सुरुवात करावी, असेही ते म्हणाले. अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या निवासाची व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोणत्याही हॉटेलने सार्वजनिक खासगी बुकिंग करू नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे, मात्र तारीख निश्चित नाही.6 नोव्हेंबरनंतर स्पष्ट चित्र दिसेल. तारखा शेवटी बदलू शकतात. हॉटेल मालकाना सांगितले की हॉटेलच्या खोल्या बुक न केलेलेच बरे.

गेल्या वेळी हॉटेलच्या खोलीचे बिल अतिशय तत्परतेने आणि पूर्ण भरले गेले. यावेळीही विलंब न लावता बिल भरण्यात येणार आहे. खोल्यांची स्वच्छता, खाद्यपदार्थांचा दर्जा व स्वच्छता राखण्यात यावी. अधिवेशनात येणाऱ्यांचा चांगला आदरातिथ्य करण्यात यावा. अधिवेशनादरम्यान सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन नीट केले जाईल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी भोजन, निवास व इतर व्यवस्था पुरेशा प्रमाणात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रशिक्षणार्थी आयएएस. अधिकारी शुभम शुक्ला आदी अधिकारी तसेच शहरातील सर्व हॉटेल व लॉजचे मालक व व्यवस्थापक बैठकीला उपस्थित होते.

Tags: