Belagavi

डीके शिवकुमार आंदोलक नव्हे, भामटा, सीडी किंग लवकरच “माजी” मंत्री होईल : रमेश जारकीहोळी

Share

डीके शिवकुमार आंदोलक नव्हे, भामटा माणूस आहे. बेळगावात आले की, प्रवासी मंदिराच्या जुन्या इमारतीतील रुम नंबर 4 मध्येच ते का थांबतात? हे आपल्या सर्वांना माहीत आहे. डीके शिवकुमार नाटक कंपनी भाजपचे नाव खराब करण्याचे काम करत आहे. राज्याचा हा सीडी किंग लवकरच “माजी मंत्री” होणार असल्याचे सांगत बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी नवीन राजकीय बॉम्ब फोडला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर आम्ही 6 महिने काहीच बोलत नव्हतो, पण डी.के.शिवकुमार नाटक कंपनी भाजपचे नाव खराब करण्याचे काम करत असून बोलणे गरजेचे आहे असे सांगत आमदार रमेश जारकीहोळी यांनी बेळगावातील प्रवासी मंदिरात पत्रकार परिषदेत डीकेशींवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, आम्ही ऑपरेशन कमळ करत नाही, आम्ही कोणत्याही काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला नाही. 50 कोटी रुपयांचे आमिष दाखवले, हे खोटे आहे. डीके शिवकुमार सत्तेत असताना ते सरकारसाठी धोक्याचे आहेत. विरोधी पक्षात असताना ते एक अन सत्तेत आल्यावर दुसरेच वागतात.

पडले तर महाराष्ट्र मॉडेलवर सरकार पडेलराज्य सरकार टिकलं पाहिजे म्हणजे हे किती दिवस हमी योजना राबवतात ते बघता येईल. पण पडलं तर महाराष्ट्र मॉडेलवर सरकार पडेल, राजीनामे किंवा अन्य कशाने नाही. लॉटरी मंत्री, लॉटरी आमदार नेहमीच डेंजर असतात. त्यांना अनुभव नसतो. सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत म्हणून मी शांत आहे.

डीके शिवकुमार मुख्यमंत्री असते तर गोष्ट वेगळी असती. सरकार पडलं तर डीके शिवकुमारची कंपनी आणि बेळगावची कंपनी पडू शकते. बेळगावच्या राजकारणामुळे सरकार पडेल. मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेतला तरच सरकार टिकेल. मागील काळात मंत्री रामलिंगारेड्डी यांनी चांगले सेटलमेंट केले होते. रमेश जारकीहोळी यांनी बंडखोरी केल्यावर नीट व्यवहार केला नाही, त्यामुळे सरकार पडले. पण यावेळी तसे होणार नाही.

मी दोन वर्षे घरकाम आणि मंदिराची कामे करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे, पण अपरिहार्य कारणांमुळे मला मीडियासमोर यावे लागले. माजी मख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची भेट घेतली असली तरी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्याच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी त्यांना वरचेवर भेटतो.

विजयपूरचे नाव बसवनाडू ठेवावे, या मुद्द्यावर, मला याबद्दल कोणतीही माहिती नाही, संपूर्ण कर्नाटकलाच ‘आंबेडकर कर्नाटक’ असे नाव द्यावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. वाल्मिकी, बसवण्णा, कित्तूर चेन्नम्मा हा इतिहास आहे. इतिहासातून आम्हाला त्यांची माहिती मिळते. पण आंबेडकर यांचे खूप योगदान आहे, ते जिवंत उदाहरण आहेत, आम्ही त्यांचे काम पाहिले आहे. त्यामुळे कर्नाटकचे नाव आंबेडकर कर्नाटक ठेवले तर चांगले आहे असे रमेश जारकीहोळी म्हणाले.

बेळगाव महानगर पालिकेतील सतीश जारकीहोळी विरुद्ध अभय पाटील या संघर्षावरील प्रश्नाचे उत्तर देताना रमेश जारकीहोळी म्हणाले की, सतीश जारकीहोळी आणि अभय पाटील यांच्यात काय चालू आहे ते मला माहीत नाही. माहिती घेऊन सर्वांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवेन. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या उमेदवारांसाठी काम करू आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करू, चिक्कोडीतील विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे तिकीट अंतिम असेल. बेळगावातून मंगल अंगडी पुन्हा लढणार नसल्याचे प्रसारमाध्यमातून समजले आहे. त्यांना भेटून चर्चा करेन असे ते म्हणाले.

डीकेशिवकुमारने 100 सीडी रिलीज केल्या, तरी मी घाबरणारा नव्हे, या आधी माझ्या सीडी या सीडी मास्टरनेच रिलीज केल्या आहेत. डीकेशी कमी गर्विष्ठ नाही. तो फुशारकी मारणारा भामटा आहे. त्याला ब्लॅकमेल करण्याशिवाय काहीही माहित नाही. माजी आमदार नागराज यांची एसआयटीकडून चौकशी करून त्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. त्याच्या धमकी, गुंडगिरीला मी घाबरत नाही. त्याने अशा 100 सीडी आणल्या तरीही मी घाबरणार नाही.

नेलमंगल, कोळेगलच्या माजी आमदारांना त्याने ब्लॅकमेल केले आहे. या प्रकरणाची सीबीआयकरवी चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री परमेश्वर यांना भेटून विचारणार आहे. या प्रकरणाची चौकशी करा. कनकपूरमधून 8 वेळा निवडून येणाऱ्या शिवकुमारने दोनच खऱ्या अर्थाने लढवल्या बाकी सगळ्या निवडणुका ऍडजेस्टमेंटच होत्या. एका वर्षात आपली संपत्ती दुप्पट करणारा डिके शिवकुमार लवकरच “माजी मंत्री” होणार असल्याचा गौप्यस्फोट रमेश जारकीहोळी यांनी केला.

एकंदर, याआधी सरकार उलथवून टाकणारे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी आपल्या स्फोटक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. रमेश जारकीहोळी यांनी आता उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. यातून त्यांचे पुढचे पाऊल काय असेल याची वाट पहावी लागणार आहे.
पॉलिटिकल ब्युरो, इन न्यूज, बेळगाव.

Tags:

#innewsbelagavi #belgaumnews #belagavi#Farmers #protest #Ramesh-jarkihol#dkshivkumar#politics