Belagavi

रस्त्याच्या मागणीसाठी मंगाईनगरवासियांचा एल्गार

Share

बेळगावातील मंगाईनगर, वडगाव येथील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने रहिवाशांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी येथील रहिवाशांनी आज, रविवारी एल्गार पुकारला.

वडगाव मंगाईनगर येथील वहिवाटीचा रस्ता भिंत बांधून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत. 25-30 वर्षांपूर्वी येथे जागा खरेदी करून घरे बांधून रहात असलेल्या रहिवाशांना मंगाई मंदिराजवळ रस्ता असल्याचे दाखवून जागा विकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते येथे जागा खरेदी करून घरे बांधून राहत आहेत. मात्र अचानक 10-12 वर्षांपूर्वी हा रस्ता झाडाचे खोड टाकून, चर मारून बंद करण्यात आला आहे. त्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी अचानकच मोठी भिंत बांधून हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे येथील रहिवाशांचे खूप हाल होत आहेत. लहान मुले, महिला आणि वृद्धांचे तर अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे रहिवाशांनी, बेळगाव महानगरपालिका आयुक्त, अभियंते, स्थानिक आमदार, जिल्हा पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली आहे. परंतु आश्वासनाखेरीज रहिवाशांच्या पदरी काहीच पडलेले नाही.

रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी जिथे शक्य आहे त्या सर्व ठिकाणचे उंबरठे मंगाईनगरवासियांनी झिजवले आहेत. मात्र त्यांना थातुर-मातुर आश्वासने देण्यात आली आहेत. महानगरपालिकेने तर आपल्याकडे या जागेची कागद्पत्रेक नाहीत असे सांगून साफ हात वर केले आहेत. अवघ्या काही मीटर अंतरावरचा रस्ता बंद केल्याने रहिवाशांना 2-3 किमीचा वळसा घालून धामणे रस्त्याने वडगावात प्रवेश करावा लागत आहे. धामणे रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा धुडगूस सुरु असतो.

लहान मुले, महिला व वृद्धांच्या अंगावर कुत्री चाल करून येत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शिवाय तेथे कचराडेपो असल्याने दुर्गंधीतून माग काढत चालावे लागते. त्यामुळे रस्ता खुला करून दिलाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत रहिवाशांनी आज मंगाईनगरात जोरदार निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

या संदर्भात इन न्यूजशी बोलताना अनेक रहिवाशांनी प्रशासनाच्या तुघलकी कारभाराबाबत तिखट प्रतिक्रिया दिल्या. महिलांनी सांगितले की, आम्ही 25-30 वर्षांपूर्वी मंगाईनगरात जागा खरेदी केली तेंव्हा आम्हाला मंदिराजवळच वहिवाटीचा रस्ता असल्याचे सांगण्यात आले होते. म्हणून आम्ही येथे जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. परंतु आता अचानक कोणीतरी रस्ता बंद केल्याने आमचे खूप हाल होत आहेत. लांब वळसा घालून आम्हाला ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे लहान मुले-वृद्धांना त्रास होत आहे. प्रशासनाने यावर मार्ग काढून आम्हाला रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी महिलांनी केली.

यथील रहिवासी गीता राजगोळी यांनी सांगितले की, रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी आम्ही संबंधित अधिकारी व स्थानिक आमदारांना देखील भेटलो होतो. त्यांनी रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र काहीच कृती केली नाही. हिंदू असलेल्यानीच आम्हा हिंदूंना मंगाई देवीच्या मंदिराला जाणारा रस्ता बंद केला आहे याचा खेद वाटतो. 4-5 वर्षांपासून रस्ता बंद केल्याने आमचे खूप हाल होत असून, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने आम्हाला रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

लहान मुलांनी देखील रस्ता बंद केल्याने आपल्याला शाळा, ट्युशनला जाण्यासाठी लांब वळसा घालून, धामणे रोडने जावे लागत असल्याची तक्रार केली. धामणे रोड भागात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक असून ती आमच्या अंगावर धावून येत असल्याने आला धोका असल्याचे या चिमुकल्यांच्या सांगितले.

दरम्यान, मंगाईनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी सांगितले की, मंगाईनगरात गेल्या 25-30 वर्षांत अनेक समस्या आहेत. पूर्वी येथे 4 क्रॉस होते. मात्र आता लोकसंख्या वाढून 11 क्रॉस झाले आहेत. त्यातच आता अचानक कोणीतरी भिंत बांधून रस्ता बंद केल्याने रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत. महापालिकेकडे तक्रार केली असता, आमच्याकडे या जागेची कागदपत्रे नाहीत असे सांगून हात वर करण्यात आले.

पालिका आयुक्त आणि अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांना आम्ही भेटून रस्ता खुला करण्याची विनंती केली असता त्यांनी आमचा व या जागेचा काही संबंध नाही असे बेजबाबदार उत्तर दिले. स्थानिक आमदार अभय पाटील यांनाही आम्ही भेटून विनंती केली, पण त्यांनीही आश्वासन दिले, पण कृती केली नाही. गेल्यावर्षी कर्नाटक राज्योत्सवाच्या आधी रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन देण्यात आले, आता वर्ष उलटून दुसरा राज्योत्सव आला तरीही रस्ता मोकळा करून दिलेला नाही. नुकतीच आम्ही जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन रस्ता खुला करून देण्याची विनंती केली आहे. त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मूळ जागा मालकाचे वारसदार बाळकृष्ण चव्हाण-पाटील व सुनील चव्हाण-पाटील यांनी रस्त्यासाठी जागा देण्यास आपली तयारी असल्याचे सांगितले. 1920मध्ये आमच्या आजोबांनी ही जागा खरेदी केली होती, रहिवाशांसाठी रस्त्यासाठी जागा देण्यास आमची वारसदार या नात्याने कोणतीच हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंगाईनगरातील लहान मुले, महिला, अपंग आणि ज्येष्ठांसह सर्व वयोगटातील रहिवाशांनी निदर्शनात भाग घेऊन रस्ता खुला करून देण्याची जोरदार मागणी केली.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews# # mangainagar #protest # Road