Belagavi

पालिकेत उबग आणणारा घटनाक्रम; माजी नगरसेवक संघटना भेटणार प्रादेशिक आयुक्तांना

Share

बेळगाव महानगरपालिकेत सध्या सुरु असलेला घटनाक्रम उबग आणणारा आहे, त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी आपले अधिकार वापरून हा गोंधळ दूर करावा यासाठी प्रादेशिक आयुक्तांना भेटण्याचा निर्णय बेळगावातील माजी नगरसेवक संघटनेने घेतला आहे.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगरसेवक संघटनेचे ज्येष्ठ सदस्य माजी महापौर नागेश सातेरी यांनी ही माहिती देऊन सांगितले की, बेळगाव महापालिकेत सध्या जो प्रकार सुरु आहे तो सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारा आहे. फाईल गहाळ झाल्यावरून शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांवर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल होणे ही बाब लाजिरवाणी आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचाच अवमान झाला आहे.

नागरिकांत चुकीचे चित्र, संदेश गेला आहे. सध्याच्या नगरसेवकांना आणि महापौर-उपमहापौरांना आपले अधिकार काय आहेत याची माहिती नाही. अशा स्थितीत अधिकारी शिरजोर होतात. निवडून गेलेले प्रतिनिधी जेंव्हा अस्तित्वहीन होतात, तेंव्हा अधिकाऱ्यांचा फावते. अशीच स्थिती सध्या बेळगाव महानगरपालिकेत निर्माण झाली आहे.

त्यामुळे माजी नगरसेवक संघटनेतर्फे येत्या मंगळवारी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. आपले अधिकार वापरून प्रादेशिक आयुक्तांनी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांना स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे बोलावून पालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी सूचना-निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात येणार आहे. बेळगाव महापालिकेची प्रतिष्ठा कायम रहावी, विकासकामांची प्रक्रिया सुरळीत व योग्यरीत्या पार पाडली जावी यासाठी सल्ले व सूचना देण्यासाठी माजी नगरसेवक संघटना स्थापन करण्यात आली आहे. मध्यंतरी कोरोनाकाळात संघटनेचे काम मंदावले होते. आता दिवाळीनंतर नवीन कार्यकारिणी नेमून संघटनेच्या कामाला गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी आमदार रमेश कुडची म्हणाले की, मी बेळगाव महापालिकेत नगरसेवक-महापौर असतानाच आमदार म्हणून निवडून आलो, पण आमदार असतानादेखील संबंधित नगरसेवकांना घेऊनच त्यांच्या प्रभागात जात असे, विकासकामे करत असे. प्रभागात नगरसेवकांची प्रतिष्ठा टिकून रहावी यासाठी दक्षता घेऊन काम केले. सध्या तशी परिस्थिती महापालिकेत नाही. गरसेवकांपेक्षा बाहेरच्या लोकांचा कारभारात हस्तक्षेप वाढला आहे.

कोणी किती हस्तक्षेप करायचा हे ज्याचे त्यांनीच ठरवायला हवे. सभागृहात महापौर सर्वोच्च असतात. पण सध्या पालिका बैठकीत कोणीही येतो, कोणीही जातो असे चित्र दिसते. आपण लोकांची कामे करण्यासाठी निवडून आलो आहोत, राजकारण करण्यासाठी नव्हे हे नगरसेवकांनी ध्यानात घेतले पाहिजे. यासंदर्भात प्रादेशिक आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी माजी नगरसेवक संघटनेची बैठक घेण्यात आली. त्यात सदस्यांनी अनेक महत्वपूर्ण चर्चा केल्या. बैठक आणि पत्रकार परिषदेला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवाजी सुंठकर, अप्पासाहेब पुजारी, धनश्री पुजारी, सविता पाटील, यल्लाप्पा कुरबर, प्रशांता बुडवी, वंदना बेळगुंदकर, माजी उपमहापौर मीना वाझ, आस्मा ताशिलदार, लतिफखान पठाण, रेणू किल्लेकर, संभाजी चव्हाण, दीपक वाघेला, संजय प्रभू आदी उपस्थित होते.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews# #Ex corporaters #Sanghatne #Meeting