बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या अनोख्या कामांची केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाच्या वतीने रविवारी 29 रोजी शहरात पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमात केंद्राचे माध्यम विभागाचे अतिरिक्त महासंचालक राजीव जैन यांच्या नेतृत्वाखाली शहरी विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय पत्रकारांच्या चमूने कामांची पाहणी केली.

बेळगावात स्मार्ट सिटीच्या कामांबाबत जनतेची मोठी ओरड सुरु आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज बेळगावात दाखल झाले. यावेळी जनतेने अधिकाऱ्यांसमोर कामांबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी केंद्रीय पथकाने स्थानिक स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसह टिळकवाडीतील नाथ पै उद्यान, शिवाजी उद्यान रोड आणि तेथील वाचनालय, व्हॅक्सिन डेपो आदी भागांतील कामांचे निरीक्षण करून, स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विभागांत झालेल्या कामांची माहिती घेतली.
यावेळी या ठिकाणी आलेल्या शहरातील काही स्थानिकांनी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांसमोर स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्मार्ट सिटीच्या कामात अनेक गैरप्रकार केले आहेत, त्याचा जनतेला त्रास होत आहे. अधिकार्यांवर प्रचंड दबाव आणून स्वतःच्या फायद्यासाठी काम करून घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
व्हॅक्सिन डेपो हा इको सेन्सिटिव्ह झोन असताना तेथे झाडांची कत्तल करून इमारती उभारण्यात आल्या. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. असेच गैरप्रकार अन्य कामातही झाले असून त्याचा ठराविक लोकप्रतिनिधींना फायदा झाला आणि संपूर्ण स्मार्ट सिटीचे काम वाया गेले. व्हॅक्सिन डेपोत अनेक वनौषधी वनस्पती असूनही नागरिकांना प्राणवायूचा पुरवठा करणारे नैसर्गिक जंगल नष्ट करून शहराच्या वायूविहाराच्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या नावाखाली इमारती उभारल्याने या कामांविरोधात जनक्षोभ निर्माण झाला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सांगितले.
केंद्रीय पथकासमोर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दडपशाहीच्या कथा, येथील समस्या, निकृष्ट कामे, सत्तेचा गैरवापर, दडपशाही, अवैज्ञानिक प्रथाही केंद्रापर्यंत पोचवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.
यावेळी पर्यावरणवादी, पुरोगामी, सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments