Belagavi

प्रामाणिक वाल्मिकी समाजाने शैक्षणिक प्रगती साधावी : आ. राजू सेठ

Share

वाल्मिकी समाज हा दिलेला शब्द पाळणारा अतिशय प्रामाणिक समुदाय आहे. या समाजाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी शिक्षण महत्वाचे असून, समाजाने शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी केले.

बेळगावातील कुमार गंधर्व रंगमंदिरात आज, शनिवारी शासकीय स्तरावरील वाल्मिकी जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार राजू सेठ पुढे म्हणाले की, बेळगावातील कणबर्गी. मुत्त्यानट्टी, काकती आदी परिसरात वाल्मिकी समाजाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. हा समाज अतिशय प्रामाणिक, दिलेला शब्द पाळणारा, त्यासाठी जीवाची बाजी लावणारा समाज आहे. परंतु आजही अनेकजण मागास, गरिबीत आहेत. या समाजाची प्रगती होण्यासाठी तुम्ही शिक्षणावर भर दिला पाहिजे. मुलांना उत्कृष्ट शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनिअर घडविले पाहिजे.

त्यासाठी शिक्षणाला प्राधान्य द्या असे आवाहन त्यांनी केले. आपली भारतीय संस्कृती जगातील महान आदर्श संस्कृती आहे. पाच हजार वर्षांपासून आपल्या प्रगत संस्कृतीतून आपण सगळेजण मिळून एकत्र वाटचाल करत आलो आहोत. अनेक साधू-संतांनी आपल्याला सहजीवनाची शिकवण दिली आहे. त्यात महर्षी वाल्मिकी यांचे स्थान उच्च आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आपण सगळेजण वाटचाल करूया असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉक्टर नितेश पाटील म्हणाले की, महर्षी वाल्मिकी यांनी माणसाने जीवन कसे जगावे, याचा आदर्श वस्तुपाठ श्रीरामाच्या जीवनावर आधारित रामायण या महाकाव्यातून घालून दिला आहे. श्रीरामांच्या जीवनाचे अत्यंत मनोहारी, अद्भुत व यथार्थ वर्णन त्यांनी रामायणाच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण वाटचाल केली पाहिजे. कर्नाटक शासनातर्फे दरवर्षी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात येते. या उपक्रमातून महर्षी वाल्मिकी यांची शिकवण, मार्गदर्शनाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी वाल्मिकी समाजातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. फ्लो
याप्रसंगी डॉक्टर राजप्पा दळवाई यांचे महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान झाले.

कार्यक्रमात जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सौरभ शुक्ला, समाजकल्याण अधिकारी बसवराज कुरिहाली, मनपा उपयुक्त उदय तळवार, वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष राजशेखर तळवार, दलित नेते मल्लेश चौगुले, महादेव तळवार, यल्लाप्पा कोलकार, भावकाण्णा भंग्यागोळ, सुरेश गवन्नावर यांच्यासह वाल्मिकी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अशोक चौकातून कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महापौर शोभा सोमनाचे यांनी मिरवणुकीचे उदघाटन केले. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते.

Tags:

#innews #ineewsbelagavi #MaharishiValmikiJayanthi #ValmikiJayanthi #Belagavi #Karnataka #India #Ramayana #Hinduism #Saint