Belagavi

बेळगावात एकाच रात्रीत भर बाजारपेठेतील पाच दुकानात चोरी

Share

बेळगावात शुक्रवारी एकाच रात्रीत चोरटयांनी भर बाजारपेठेतील 5 दुकाने फोडली. यातील दोन दुकानातील गल्ले चोरटयांनी साफ केले. या धाडसी चोऱ्यांमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

होय, बेळगावातील पांगुळ गल्ली-मेणसे गल्लीतील 3 तर शेरी गल्लीतील शनिमंदिरामागील 2 दुकाने शुक्रवारी रात्री फोडण्यात आली. शटर उचकटून आत शिरलेल्या चोरटयांनी 2 दुकानांच्या गल्ल्यातील रकमेवर चोरटयांनी डल्ला मारला. मध्यरात्रीनंतर एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या चोऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे व्यापारीवर्गात खळबळ माजली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पांगुळ गल्ली-भेंडीबाजार येथील न्यू लाईफ मेडिकल्स, संस्कार सारीज आणि सिद्धेश्वर ट्रेडर्स या तीन दुकानात चोरी करण्यात आली. तर शेरी गल्लीतील शनिमंदिरामागील पद्मावती चेंबर्समागील अशोक क्लॉथ स्टोअर्स व अन्य एक अशी 2 दुकाने शुक्रवारी रात्री फोडण्यात आली. चार चोरटयांच्या टोळक्याने या चोऱ्या केल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजवरून दिसून आले आहे. अगदी आरामात दुकानांचे शटर उचकटून बिनधास्त आत घुसून चोरटयांनी गल्ल्यावर डल्ला मारला. कार्यभाग उरकून चोरटे निवांतपणे निघून गेल्याचे दृश्यही सीसीटीव्हीत चित्रित आले आहे.

आज सकाळी संबंधित दुकानमालकांनी आपापली दुकाने उघडल्यावर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर मार्केट पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मार्केट पोलिसानी श्वान दल, ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. श्वानाच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ठसेतज्ज्ञांनी चोरट्यांचे ठसे घेतले.

दरम्यान, भर बाजारपेठेतील या धाडसी चोऱ्यांमुळे व्यापारीवर्गात घबराट पसरली आहे. या संदर्भात इन न्यूजशी बोलताना येथील व्यापारी रमेश भंडारी यांनी सांगितले की, भरवस्तीत चोरटयांनी बिनधास्तपणे या चोऱ्या केल्या. त्यामुळे आम्हाला भीती वाटू लागली आहे. एका रात्रीत पाच दुकाने फोडणे ही साधी गोष्ट नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून चार चोरट्यांच्या टोळक्याने या चोऱ्या केल्याचे दिसून आले आहे. गुरखा, पोलिसांची गस्त कुचकामी ठरल्याचे यावरून दिसते. किमान ५०-६० हजार रुपये चोरटयांनी लाटले असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या धाडसी चोऱ्यांमुळे बेळगावातील व्यापारी वर्गात खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाचही चोऱ्यांप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याना जेरबंद करण्यासाठी जाळे विणले आहे.

Tags:

#Burglary #Belagavi #Karnataka #India #Market #Shops #Safety #Security #Police #Investigation #Crime