Belagavi

जायंट्स मेनने केली सीमोल्लंघन मैदानाची स्वच्छता

Share

विजयादशमी दसऱ्यानिमित्त मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी सीमोल्लंघन पार पडले. मात्र यावेळी नागरिकांनी निर्माण केलेल्या कचऱ्यामुळे मैदान अस्वच्छ बनले होते. त्याची जायंट्स ग्रुप बेळगाव मेनच्या सदस्यांनी स्वच्छता केली.

विजयादशमी दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघनासाठी बेळगाव शहरातील पालख्या कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर येत असतात. बेळगावकर नागरिक मोठया प्रमाणात या ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रमास येतात. या कार्यक्रमावेळी अनेक खाद्यपदार्थाच्या गाड्या, स्टॉल्स लावण्यात आलेले असतात. पण खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर रद्दीपेपर, प्लेट्स,प्लास्टिकचे चमचे,

ग्लास इतर साहित्य मैदानावरच फेकले जातात. २०१५ पासून सातत्याने या ठिकाणी पडलेल्या कचऱ्याची उचल दुसऱ्या दिवशी सकाळी जायंट्स मेनच्या माध्यमातून केली जाते. यावर्षीही ग्रूपच्या सदस्यानी सीमोल्लंघन मैदानावर स्वच्छता मोहीम राबवली संपूर्ण मैदानावरील कचरा पाच सहा ठिकाणी एकत्रित करून ठेवला असे अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून जायंट्सने स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना आवाहन करून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण स्वच्छता आणि प्लास्टिक वापराच्या बाबतीत उलट वाढच झालेली दिसत आहे याबद्दल मदन बामणे यांनी नाराजी व्यक्त केली.

स्पेशल कमिटी सदस्य मोहन कारेकर यांनीही जनतेला पुन्हा एकदा स्वच्छता राखण्याबद्दल आवाहन केले आणि प्रशासनाने स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष घातले पाहिजे असे सांगितले.
पहाटेपासून जवळपास तीन तास जायंट्सचे सचिव लक्ष्मण शिंदे, माजी अध्यक्ष विकास कलघटगी, अशोक हलगेकर, संजय पाटील, मुकुंद महागावकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील, अरुण काळे, यल्लाप्पा पाटील, अजित कोकणे, दिगंबर किल्लेकर, खजिनदार विजय बनसुर, मधू बेळगावकर, महेश रेडेकर, सुरेश पिसे, महादेव भस्मे, प्रकाश तांजी यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

Tags: