Belagavi

बेळगावच्या मध्यवर्ती भागात दुर्गामाता दौडीमुळे चैतन्य

Share

बेळगावच्या मध्यवर्ती भागात नवरात्रातील खंडेनवमीच्या नवव्या दिवशीची दुर्गामाता दौड काढण्यात आली. प्रेरणादायी गीते गात युवक-युवतींचा जल्लोषी सहभाग आजच्या दिवशी पहायला मिळाला तर चिमुकल्यांनी शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांवरील देखावे सादर केले.

देव, देश अन धर्माच्या रक्षणाचा संदेश देत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बेळगावातील ताशिलदार गल्ली, महाद्वार रोड, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली आदी मध्यवर्ती भागात आज दुर्गामाता दौड काढण्यात आली. सळसळत्या उत्साहाने सहभागी झालेल्या नवयुवक-नवयुवतींचा लक्षणीय सहभाग आजच्या दौडमध्ये दिसून आला. त्याशिवाय सर्व वयोगटातील शिवप्रेमींनी जल्लोषात सहभाग घेतला.

ताशिलदार गल्लीतील श्री सोमनाथ मंदिरापासून आज सोमवारच्या दौडीला भगवा ध्वज पूजनाने प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, मुजावर गल्ली, कांगली गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, महाद्वार रोड, तानाजी गल्ली, समर्थनगर चौथा व पाचवा क्रॉस, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर, या मार्गांवर फिरून कपिलेश्वर रेल्वे ओव्हरब्रीज मार्गे शनिमंदिर येथे दौडीची सांगता झाली.

पांढऱ्या शुभ्र पेहरावात लहान मुले-मुली, युवक-युवती आणि अन्य वयोगटातील नागरिकांनी भगवे फेटे बांधून प्रेरणागीते गात दौडमध्ये प्रचंड उत्साहात भाग घेतला. काही युवक-युवती घोड्यावर सवार होऊन सहभागी झाले होते. तुतारी, ढोल अशा पारंपरिक वाद्यांनी दौडीला आणखी रंगत आणली. तर चिमुकल्या मुलांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित देखावे सादर करून शिवरायांचा जाज्ज्वल्यपूर्ण इतिहास जागवला.

दौडसंदर्भात इन न्यूजशी बोलताना मोनाली परब यांचा उत्साह ओसंडून वहात होता. या दौडीमध्ये मी गेली 8 वर्षे सहभागी होत आहे. मला देव, देश आणि धर्माबद्दल प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या रक्षणाची प्रेरणा आणि शिकवण या दौडमधून मिळते. त्यामुळे प्रत्येक महिलेने, प्रत्येक घरातील सदस्यांनी या दौडमध्ये सहभागी झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

सहभागी अन्य युवकांनी सांगितले की, गेली 22 वर्षे आम्ही या दौडमध्ये सहभागी होत आहोत. जगायचे कसे, रहायचे कसे याचे संस्कार या दुर्गामाता दौडमधून होतात. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास, परंपरा जपून त्या पुढे चालविण्याची प्रेरणा दौडमधून मिळते असे त्यांनी सांगितले.


रुबाबदार भगवे फेटे हे बेळगावच्या दुर्गामाता दौडचे खास वैशिष्ट्य आहे. हे फेटे बांधणारा अन फेटेवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर कांबळे या युवकाने इन न्यूजला सांगितले की, आधी मी दुर्गामाता दौडमध्ये भाग घेत नव्हतो. मात्र 14 वर्षांपसून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्ग-गडकोट मोहीम केल्यापासून गेल्या 7 वर्षांपासून दुर्गामाता दौडमध्ये सक्रिय सहभागी होत आहे. फेटे बांधणे ही मातीतली कला आहे. ती मला येते. त्याचा उपयोग करून रोज सकाळी 5 वाजता येऊन दौडमधील सहभागी कार्यकर्त्यांना फेटे बांधण्याची सेवा देतो.

एकंदर नवव्या दिवशीच्या दुर्गामाता दौडमुळे बेळगावच्या मध्यवर्ती भागात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

Tags: