Belagavi

येळळूरमध्ये नेताजी युवा संघटनेच्या भजन स्पर्धेचे उद्घाटन

Share

वारकरी संप्रदाय जगात सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. भजन-कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी व्यसनमुक्त समाजासाठी कार्य केले, त्याचप्रमाणे नेताजी युवा संघटनेच्या वतीने सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले हे महत्वपूर्ण कार्य आहे असे कौतुकोद्गार माजी विधान परिषद सदस्य व केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी काढले.

येळ्ळूरमधील नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येथे नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेचे उदघाटन महांतेश कवटगीमठ यांनी केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, युवकांना चांगले संस्कार व चांगल्या संस्कृतीचे आचार विचार देण्यासाठी अशा संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करणे खूप गरजेचे आहे. शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या नेताजी युवा संघटनेच्यावतीनेे आयोजित भजन स्पर्धा समाजासाठी व युवकासाठी एक वेगळी दिशा देईल यात शंका नाही. अशा स्पर्धांची आमच्या समाजाला आज गरज आहे असे कवटगीमठ यांनी सांगितले.

स्पर्धेमध्ये एकूण 25 मंडळांनी भाग घेतला असून दोन दिवसीय स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भजनी मंडळांनी एकापेक्षा एक सरस भजन व गवळणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे होते. दीपप्रज्वलन येळळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, उद्योजक राजेंद्र मुतगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नेताजी प्रतिमेचे पूजन माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळळी यांनी केले. ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांच्या हस्ते झाले,

तुकाराम प्रतिमेचे पूजन महादेव कुगजी यांच्या हस्ते झाले. सरस्वती प्रतिमेचे पूजन अभियंते हणमंत कुगजी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी .बाचीकर, नेताजी सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, शेतकरी सोसायटीचे चेअरमन दीपक कर्लेकर, व्हाईस चेअरमन श्रीधर कानशिडे, उद्योजक पुंडलिक पावशे, मार्कंडेय साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आर. आय. पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब भेकणे, सुनील अष्टेकर, कवटगीमठ सोसायटीचे चेअरमन शरद कवटगीमठ आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: