सळसळता उत्साह, जय भवानी-जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय असा जयघोष करत, प्रेरणागीते गात बेळगावच्या दक्षिण भागात आज आठव्या दिवशीची दुर्गामाता दौड जल्लोषात काढण्यात आली. शहापूर, खासबाग, वडगाव भागात पहाटेपासूनच चैतन्याचे वातावरण पसरले.

होय, आपल्या भागात दुर्गामाता दौड कधी येणार अशी प्रतीक्षा लागून असलेल्या दक्षिण भागातील बेळगावकर नागरिकांची आस आज संपली. दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यासाठी शनिवारची सगळी रात्र एक करून जागून महिलांनी दौडीच्या मार्गावर आकर्षक, सुबक रांगोळ्या साकारल्या होत्या, तर मुलांनी, युवकांनी मार्गावर झेंडूच्या फुलांची आणि भगव्या पताका, फेट्यांची तोरणे आणि भगवे ध्वज लावून दौडचा मार्ग सुशोभित केला होता.

आज रविवारी सकाळी नाथ पै सर्कल, शहापूर येथील श्री अंबाबाई मंदिरापासून दौडीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर लक्ष्मी रोड, कारवारी गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर चौक, बाजार गल्ली, बनशंकरी नगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, नार्वेकर गल्ली, पीबी रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमळ गल्ली, खडेबाजार, महात्मा फुले रोड, मिरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळी गल्ली, महात्मा फुले रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथे दौडीची सांगता झाली.

दौडीच्या मार्गावर फुलांची उधळण करून दौडीचे स्वागत करण्यात येत होते. महिलांनी आरती ओवाळून ध्वजपूजन केले. वीररसयुक्त पोवाडे, गाणी ध्वनिप्रक्षेपकावर लावण्यात आली होती. त्यामुळे सर्वांच्या अंगात वीरश्री संचारत होती. शुभ्र वेष, भगवे फेटे, टोप्या घातलेले हजारो युवक-युवती, लहान मुले आणि ज्येष्ठ सळसळत्या उत्साहाने दौडीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे किशोरवयीन युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता.
दरम्यान, गेली दहा वर्षे दौडीमध्ये सहभागी होणाऱ्या अंबिका राहुल कांगले या युवतीने इन न्यूजशी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांची देव, देश अन धर्म रक्षणाची शौर्यपूर्ण परंपरा कायम सुरु रहावी यासाठी दुर्गामाता दौड हा उपक्रम सहाय्यकारक ठरतो, तो कायम सुरु राहिला पाहिजे असे सांगितले. राज्याभिषेकावेळी ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा’ असे शिवरायांनी म्हटले होते. हे स्वप्न साकारण्यासाठी दौडीचा उपक्रम आवश्यक असल्याचे तिने सांगितले.
राहुल देशपांडे व रोहित या युवकांनी, हिंदू धर्म, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी दुर्गामाता दौड आवश्यक आहे असे सांगून मोबाईलच्या विळख्यात सापडलेल्या आजच्या तरुणाईला खेळ आणि आरोग्याकडे परत आणण्यासाठी असे उपक्रम झाले पाहिजेत असे सांगितले. अन्य राज्ये किंवा देशातील संस्कृती, उपक्रम अवलंब करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, स्थानिक स्वातंत्र्यसैनिक आदींनी घालून दिलेल्या मार्गावरून आपण चालले पाहिजे याची शिकवण दुर्गामाता दौडमधून मिळते असे त्यांनी सांगितले.
एकंदर, आजच्या दुर्गामाता दौडीमुळे शहापूर, खासबाग वडगाव, भारतनगर, आनंदवाडी आदी बेळगावच्या दक्षिणेकडील भागात संपूर्ण चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते.


Recent Comments