Belagavi

बेळगावात मुस्लिम बांधवांकडून दुर्गामाता दौडीचे उत्स्फूर्त स्वागत

Share

बेळगावात धार्मिक सलोख्याचे आदर्श उदाहरण आज पहायला मिळाले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रानिमित्त कॅम्प परिसरात काढलेल्या दुर्गामाता दौडचे मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. इतकेच नाही तर सहभागी धारकऱ्यांना फळे , साखर , बिस्किटे , पाणी अर्पण करण्यात आले.

नवरात्राच्या सातव्या दिवशी आज बेळगावातील कॅन्टोन्मेंट-कॅम्प परिसरात दुर्गामाता दौड काढण्यात आली. त्यामुळे या परिसरात जणू भगवे वादळ संचारल्याचा प्रत्यय आला. त्यावेळी दरवर्षीप्रमाणे आजही दुर्गामाता दौडच्या प्रारंभी मुस्लीम समाजाच्या वतीने भगव्या ध्वजाला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजीद शेख यांनी ध्वजपूजन करून फळे, साखर, बिस्किटे, पाणी देऊन धारकऱ्यांचे स्वागत केले. यातून कॅम्प परिसरातील मुस्लिम समाजाने धार्मिक सलोख्याचे आदर्श घालून दिला.

यावेळी बोलताना साजिद शेख यांनी, दरवर्षी नवरात्रात निघणाऱ्या दुर्गामाता दौडचे आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने शानदार स्वागत करून फळे, बिस्किटांचे वाटप करतो. दुर्गामाता दौड ही बेळ्गावची शान आणि सर्वांचा अभिमान आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी सदस्या डॉ. राहिला शेख वाहिद, इब्राहिम, साबीर, श्री कलाई, अरफत, महादेव, बशीर, प्रकाश अण्णा, गोविंद, जावेद, रवी, सागर, शाहिद, अमजद, राम खानोलकर, रफिक, वीणा मिरजकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी काँग्रेस रोडवरील श्री शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. त्यानंतर ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडंट रोड, हायस्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीटमार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, हायस्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट रोड, तेलगू कॉलनी, केटी पुजारी दुर्गामाता मंदिर, कॅम्प हनुमान मंदिर, खानापूर रोडमार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गावरून दुर्गामाता दौडचा संचार होऊन जत्तीमठ दुर्गामाता मंदिर येथे दौडची सांगता झाली.

यावेळी हजारी लहान मुले-मुली, युवक-युवती, आबालवृद्ध शुभ्र कपडे, भगवे फेटे, टोप्या परिधान करून छत्रपती शिवरायांचा, धर्मवीर संभाजी महाराज आणि माता दुर्गेचा जयघोष करत जल्लोषात उत्साहाने दौडमध्ये सहभागी झाले होते. एकूणच परंपरेप्रमाणे कॅम्प परिसरात मुस्लिम व अन्य समाजांनी दुर्गामाता दौडचे उत्स्फूर्त स्वागत करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

Tags: