Belagavi

दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरावर कित्तूर उत्सव मोठ्या थाटात करणार साजरा

Share

दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरावर कित्तूर उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले की, कार्यक्रमात विविध आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होणार असून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हंसलेखा यावेळी कित्तूर महोत्सवात सहभागी होणार आहेत.

कित्तूर महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांची आणि तयारीची माहिती त्यांनी शुक्रवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

म्हैसूर दसऱ्याच्या धर्तीवर उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 13 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू मेथोडिस्ट चर्चच्या प्रांगणात राज्यभर फिरणाऱ्या वीरज्योतीचे लोकार्पण केले होते .

कित्तूर किल्ल्याच्या आवारात दरवर्षी प्रमाणे 23 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कित्तूर उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने या महोत्सवासाठी यापूर्वीच 2 कोटी अनुदान दिले असून कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही. क्रीडा, मनोरंजन, बौद्धिक संकुल, फळे, फुलांचे प्रदर्शन यासह सर्व कार्यक्रमांची तयारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

राज्यस्तरीय पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय कलाकार या कार्यक्रमात सहभागी होतील.
गतवेळप्रमाणेच कलाकारांना ऑनलाईन पेमेंट दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

स्थानिक कला पथके मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बसण्याची व जेवणाची व्यवस्था यासह सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

याच प्रसंगी कित्तूर उत्सव-2023 च्या प्रचार साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पत्रकार परिषदेत बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, महानगर पालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, बैलहोंगल उपविभागीय अधिकारी प्रभावती, बेळगावच्या उपविभागीय अधिकारी श्रवण नायक, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री व इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags: